चोरीच्या 20 दुचाकींसह अट्टल चोरटे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

धुळे शहर, देवपूर, पश्चिम देवपूर, धुळे तालुका हद्दीतून लांबवल्या दुचाकी


Attal thieves caught with 20 stolen bikes in local crime branch’s net धुळे (5 सप्टेंबर 2024) : मास्टर की चा उपयोग करून शहरातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 20 दुचाकी लांबवणार्‍या कुविख्यात दुचाकी चोरट्यांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. चार लाख दहा हजार रुपये किंमतीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून संबंधित वाहनधारकांनी आपल्या वाहनांची ओळख पटवून वाहने न्यावीत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी केले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीला जात असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते व या अनुषंगाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळताच त्यांनी संशयीत पंकज सुभाष नलावडे (43, स्वामी विवेकानंद कॉलनी, पंचायत समितीमागे, देवपूर, धुळे) व सुरज तानाजी गवळी (21, साईबाबा नगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे) यांना ताब्यात घेतले. संशयीतांना बोलते केल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरींची कबुली दिली. आरोपींनी राहत्या घरासह पांझरा नदीकिनारी, नकाणे रोड परिसरात चोरी केलेली 20 वाहने लपवून ठेवल्याने ती जप्त करण्यात आली.






13 गुन्ह्यांची उकल : 20 दुचाकी जप्त
आरोपींच्या ताब्यातून चार लाख दहा हजार रुपये किंमतीच्या 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यात धुळे शहर हद्दीतील पाच, देवपूर हद्दीतील चार, पश्चिम देवपूर हद्दीतील दोन, धुळे तालुका व छावणी, ता.मालेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा एकूण 13 गुन्ह्यांची उकल झाली आहे तर अन्य सात दुचाकींबाबत चेचीस व इंजिन क्रमांकावरून ओळख पटवली जात आहे. आरोपी पंकज नलावडेविरोधात यापूर्वी पश्चिम देवपूर पोलिसात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, हवालदार हेमंत बोरसे, हवालदार मच्छिंद्र पाटील, हवालदार योगेश चव्हाण, हवालदार प्रल्हाद वाघ, कॉन्स्टेबल नितीन दिवसे, कॉन्स्टेबल अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !