बोदवड शहरासाठी 95 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश : नागरिकांमध्ये समाधान

95 crore water supply scheme approved for Bodwad city बोदवड (5 सप्टेंबर 2024) : बोदवड शहरासाठी नगरोत्थान महाभियानांतर्गत 95.14 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून तिला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाने 5 सप्टेंबर रोजी आदेशही काढले आहेत. अवघ्या महिनाभरापूर्वी या योजनेला मंजुरी मिळाली होती व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 95.14 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला शासकीय मान्यता मिळाली.
महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात
योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आता लवकरच निविदा प्रक्रिया होईल व महिना भरानंतर कामास सुरुवात सुरुवात होईल, अशी माहिती आमदारांचे स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली.
बोदवडकरांचा पाणीप्रश्न मिटणार
गेल्या अनेक वर्षांपासून बोदवड शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. बोदवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे ड्रीम प्रोजेक्ट हाती घेवून आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला व अवघ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात वचन पूर्ती केल्याने बोदवडवासीयांनी आमदारांचे आभार मानले आहे.


