सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी पंतप्रधानांची भेट : खासदार संजय राऊत म्हणाले लोकांच्या मनातल्या शंका पक्क्या झाल्या !


मुंंबई (12 सप्टेंबर 2024) : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जावून गणपतीची आरती केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? या लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्याचे ते म्हणाले आहेत.

सरकार वाचवण्यासाठी काही वेगळे घडतेय का ?
खासदार राऊत म्हणाले की, तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातय. हे सरकार घटनाबाह्य आहे, असे सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले. काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्यामुळे यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळे काही घडतंय का?, असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

आम्हाला न्याय का मिळत नाही?
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, प्रधानमंत्री गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले त्याची माझ्याकडे माहिती नाही. पण काल सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले. त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणार्‍या घेणार्‍या राष्ट्रामध्ये एक छान चित्र पाहायला मिळाले. सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का? याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश, महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही? तारखांवर तारखा का पडत आहेत याबाबत आमच्या मनात आता शंका आहे.

 


कॉपी करू नका.