गणपती, महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान गेले तर इतका गहजब का? : देवेंद्र फडणवीस !
If the Prime Minister goes to Ganapati, Mahalakshmi Puja, why is it so crowded? : Devendra Fadnavis! नागपूर (12 सप्टेंबर 2024) : गणपती, महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधानांनी श्रीगणेशाचे तसेच ज्येष्ठा गौरींचे दर्शन घेतले आणि आरतीही केली. यावरून आता विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्यात आली. या टिकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सडेतोड शब्दांत उत्तर देत विरोधकांना विचारणा केली आहे.
गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा… अपमान नाही का?
देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोटो शेअर करत विरोधकांवर पलटवार केला आहे. प्रश्न गहन आहे… हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा… अपमान नाही का? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सरन्यायाधीश महाराष्ट्रातील
एक्सवरील पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. गौरी-गणपतीतील महालक्ष्मी पूजन सुद्धा होते. देशाचे सरन्यायाधीश न्या.धनंजय चंद्रचूड यांच्याकडे पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.