गणेशोत्सवातील महाप्रसाद खाल्यानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा : शिवरे गावात खळबळ
पारोळा (14 सप्टेंबर 2024) : गणपती विसर्जनानिमित्त शुक्रवारी आयोजित भंडार्याच्या कार्यक्रमात शिवरे, ता.पारोळा येथील सारंग माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे आदी त्रास होऊ लागल्याने त्यांना लगेच शाळेतील शिक्षक व पालकांनी प्रथम तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार झाल्यानंतरही त्रास होत असल्याने पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
महाप्रसादात झाली विषबाधा
शिवरे दिगर येथील स्वर्गीय वसंतराव जिभाऊ बहुउद्देशीय संस्था संचलित सारंग माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, 13 सप्टेंबर रोजी सात दिवसाच्या गणपती विसर्जना निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वरण, भात, गुलाब जामुन, मठाची भाजी असा महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना काही तासानंतर मळमळ, चक्कर असा त्रास होऊ लागला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तत्काळ तामसवाडी येथून पारोळा येथे हलविण्यात आले. साधारण पाच वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते. अन्नातूनच विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
पालकांची वाढली गर्दी
प्रारंभी 20 ते 25 विद्यार्थ्यांनाच त्रास झाला मात्र हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत ही संख्या 50 ते 60 वर गेली. काही विद्यार्थ्यांवर पारोळा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावेळी कुटीर रुग्णालयात गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.