उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले ; नाथाभाऊंच्या प्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर निर्णय घेणार !

0

BJP DCM Devendra Fadnavis On Eknath Khadse मुंबई (15 सप्टेंबर 2024) : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी अलीकडेच एबीपी माझ्याच्या कट्ट्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते शिवाय आता भाजपा प्रवेशाच्या मार्गावर फुली मारल्याचा दावाही केला होता. या संदर्भात राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य असल्याचे सांगत गणेशोत्सवानंतर खडसेंचा प्रवेशाचा निर्णय होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, भाजपा नेतृत्वाकडून खडसेंना आता प्रवेश देण्याबाबत सकारात्मकता दर्शवण्यात येत असलीतरी नाथाभाऊ भाजपात जाणार का? असा प्रश्न उपस्थित आहे.

नाथाभाऊ म्हणाले, फडणवीस यांनी मुलीची शप्पथ घेतली
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कट्ट्यावर नाथाभाऊंनी बोलताना 2019 मधील किस्सा सांगितला. देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलनंतर आपण त्यांची भेट घेतली व त्यांनी आपल्याला राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर त्यांना म्हणालो, देवेंद्रजी खरे सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितले की हे करणार, ते करणार, हे देणार वगैरे. पण, काही झाले नाही. त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, असे त्यांना सांगितले. यावर, ते म्हणाले की, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो की, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झाले मला माहिती नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिले होते, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला.

केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य : योग्य निर्णय घेतला जाईल
नाथाभाऊंच्या दाव्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, खडसे काय म्हणाले, हे मी ऐकलेले नाही मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हा सर्वांना मान्यच आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल.


कॉपी करू नका.