जळगाव जि.प.च्या महिला बालकल्याण विभागाच्या महिला अधिकार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

0

जळगाव (15 सप्टेंबर 2024) : जिल्हा परिषदेच्या जिल्हा महिला बालकल्याण विभागातील महिला अधिकारी मयुरी देवेंद्र राऊत करपे (32, रा.दादावाडी परिसर, श्रीरामनगर) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्य आल्यानंतर त्यांचे पती तथा जि.प.कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी इमारतीच्या सहाव्या मजला गाठला मात्र नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांना रोखण्यात आले. हा प्रकार शनिवार, 14 रोजी दुपारी चार वाजता घडला.

आरोग्य तपासणीसाठी जाताना गाठले मृत्यूने
प्राप्त माहितीनुसार, देवेंद्र राऊत हे जिल्हा परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या पत्नी मयुरी राऊत करपे या जि.प.त महिला बालकल्याण विभागाच्या आकाशवाणी चौक परिसरातील कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. राऊत कुटुंब श्रीरामनगर येथे दोन मुलींसह वास्तव्यास आहेत. शनिवार, 14 रोजी शासकीय सुटी असल्याने नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी देवेंद्र राऊत तसेच त्यांच्या पत्नी मयुरी राऊन दुपारी खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास निघाले. हॉस्पिटलच्या पायर्‍या चढून जात असताना मयुरी करपे – राऊत यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला व त्या जागेवर कोसळल्या.

त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. ही वार्ता कानावर पडताच पती देवेंद्र राऊत स्तभ होऊन मानसिक नैराश्यात आले. ते कोणाला काही एक न सांगता इमारतीच्या सहाव्या मजल्याकडे जाऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या काही सहकार्‍यांनी त्यांना थांबवित धीर दिला. त्यामुळे अनर्थ टळला.

मयुरी करपे यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. ही वार्ता कळताच जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी तसेच महिला बाल कल्याण कार्यालयातील अधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेने अनेकांना जबर धक्का बसला. तर करपे राऊत कुटुंब शोकमग्न झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. राऊत दाम्पत्यास गौरी व गाथा या दोन मुली असून, घटना घडली तेव्हा त्या शाळेत गेल्या होत्या. मयुरी यांच्या अचानक निधनाने चिमुकल्या मुलींचे मातृछत्र हरविले आहे.

 


कॉपी करू नका.