भुसावळकरांना मोठा दिलासा : खड्डेमय यावलसह जळगाव मार्गाचे होणार काँक्रिटीकरण
आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यातून 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Jalgaon road with potholes will be concretized भुसावळ (16 सप्टेंबर 2024) : सीआरएफ योजनेतून शहरातील यावल नाका ते जामनेर शहर या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल 150 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे शहरातील सर्वाधिक वाहतूक असलेला यावल व जामनेररोडचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यावल नाका ते थेट जामनेरोडवरील साईबाबा मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण होईल. या दोन्ही अत्यंत महत्वाच्या मार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य आहे. वारंवार डांबरीकरण व पॅचवर्कची कामे करुनही खड्डे कायम राहत असल्याने आता कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून या मार्गाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या कामांना आगामी सहा महिन्यांत या कामाला सुरवात होईल. यामुळे सध्या शहरातील रस्ते खिळखिळे असले तरी आगामी काळात रस्त्यांच्या कामाना निधी मंजूर झाल्याने रस्त्यांचे रुपडे बदलणार आहे.
दोन्ही बाजूंनी भुमिगत गटारी
यावल व जामनेररोडवरील काँक्रिटीकरण कामाचे नियोजन अत्यंत सुक्ष्म पध्दतीने होणार आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी पाण्याचा निचरा होण्यासाठी भुमिगत गटारी असतील. यामुळे रस्त्यावर साचणार्या पाण्याची समस्याही सुटेल. यासोबतच दुभाजकांचे आकार कमी करणे, नवीन पथदिवे बसविणे आदी कामांमुळे या दोन्ही मार्गांचे रुपडेच बदलणार आहे. मात्र या कामासाठी भुसावळकरांना किमान चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल.

अंतर्गत रस्त्यांचेही भाग्य उजळले
शहरातील गांधी पुतळा ते सतारे चौक या मार्गाच्या डांबरीकरणासाठी 50 लाख, एचडीएफसी बँक ते दगडी पूल या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 50 लाख, यावल रोडवरुन शांतीनगरला जोडणार्या दोन्ही प्रमुख मार्गांच्या डांबरीकरणासाठी प्रत्येकी 50 लाख, वसंत टॉकीज ते दोन नंबर पेट्रोल पंप मार्ग डांबरीकरण 50 लाख, प्रभाकर हॉल ते गजानन महाराज नगर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 50 लाख असा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नशिराबाद बोदवड रस्त्याचेही काँक्रिटीकरण
शहरातील रस्त्यांसोबतच नशिराबाद ते बोदवड या रस्त्यांचेही काँक्रीटीकरण केले जाणार आहे. यामुळे सुनसगाव, कुर्हे पानाचे, मोंढाळे, शिंदी या गावांसह व परिसरातील ग्रामस्थांनाही दिलासा मिळेल. या कामासाठीही 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी काळात निविदा होऊन या कामांना सुरवात होईल. यामुळे तालुक्यातील अंतर्गत भागही कात टाकणार आहे.
चोरवडपर्यंत होणार चौपदरीकरण
शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाला महत्व दिले आहे. नाहाटा ते डीवायएसपी कार्यालय रस्ता चौपदरीकरण आहे. तर आगामी सीआरएफ निधीतून जामनेर शहरापर्यंतच्या काँक्रीटीकरण कामात चोरवडपर्यंतचा मार्ग चौपदरीकरण होईल. यामुळे शहरविकासाला गती येईल, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.




