विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा दिवसात आचारसंहिता ?

महायुतीसह मविआमध्ये बैठकांचे सत्र ः इच्छुकांची मोर्चे बांधणी



मुंबई (18 सप्टेंबर 2024) :
राज्यात विधानसभा निवडणुकासाठी इच्छूकांकडून मोर्चे बांधणीला सुरूवात झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात आचारसंहित लागण्याचे संकेत दिले तर मंत्री गिरीश महाजन यांनी 10 ते 15 दिवसात आचारसंहिता लागण्याचे संकेत दिले आहेत. या अनुशंगाने महायुती व महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

तीन दिवस चर्चा करणार : खासदार राऊत
खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या व्यस्त आहे तरीही जागा वाटपाचा लवकर तोडगा काढला पाहिजे. काँग्रेस नेत्यांना आम्ही बैठकीचं आमंत्रण दिलंय. ते इतके व्यस्त आहेत त्यामुळे तारखावर तारखा देत आहेत. त्यामुळे आज आम्ही ठरवलंय, काहीही झालं आजपासून तीन दिवस आम्ही चर्चा करू.

महायुतीही अ‍ॅक्टीव्ह
पुढील दोन दिवसानंतर जागा वाटपावर युतीच्या बैठका सुरू होत आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पहिली बैठक होईल. या बैठकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी किती जागा लढवणार याचा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर येत्या आठ दवसांत काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे बैठकांना वेग आला आहे. युतीबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि घोषणाही करतील अशी माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

तिसर्‍या आघाडीचीही बैठक
राज्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यासोबत आता तिसर्‍या आघाडीचीही बैठक होणार आहे. आमची तिसरी आघाडी नसून महाशक्ती असेल, ही जनतेची शक्ती असेल. याबाबत उद्या आमची बैठक आहे. राजू शेट्टी, संभाजीराजे, राजरत्न आंबेडकर आणि काही मुस्लीम संघटनांशी आमची चर्चा आहे. या बैठकीत वैचारिक मुद्दे स्पष्ट होतील त्यातून आम्ही निवडणुकीला सामोरे जावू अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ऑनलाईन दिले आहे.


कॉपी करू नका.