धुळ्यातील अट्टल बॅटरी चोरटा जाळ्यात : मेहुणबारे पोलिसांची कामगिरी

0

चाळीसगाव (18 सप्टेंबर 2024) : मेहुणबारे पोलिसांनी वाहनातील बॅटरी लांबवणार्‍या चोरट्याला अटक करीत त्याच्याकडून दहा बॅटरी जप्त केल्या. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावातून वेगवेगळ्या वाहनांच्या एकूण 10 बॅटरी चोरी गेल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शेख शफिक शेख सलीम (38 रा.भाभानगर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

धुळ्यातील चोरट्याला बेड्या
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील राहुल विश्वास पाटील यांच्या वाहनाचे आणि परिसरातील इतरांचे वाहनातून बॅटरी चोरून नेल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी उघडकीला आली होती. यासंदर्भात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या शोध घेत असताना मेहूणबारे पोलिसांना बॅटर्‍यांची चोरी करणारा संशयित आरोपी शेख शफिक शेख सलीम (38 रा.भाभानगर, धुळे) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सोमवार, 16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता शेख शफिक शेख याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही चोरी हमीद उर्फ नाट्या अन्सारी (रा.धुळे) याच्यासोबत केल्याची कबुली दिली आहे.

कारसह बॅटरी जप्त
दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण 10 बॅटर्‍या आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. त्याच्याकडून अजून काही इतर गुन्हे उघडण्याची शक्यता आहे. शेख शफिक शेख सलीम हा परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, गोकुळ सोनवणे, सचिन निकम, निलेश लोहार, राकेश काळे यांनी केली आहे.

 


कॉपी करू नका.