तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचे अंश !

आंध्र प्रदेशमध्ये प्रसादावरुन रंगले राजकारण : वायएसआर पक्षाने आरोप फेटाळले

0

तिरुपती (20 सप्टेंबर 2021) : आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती बालाजी मंदिरात दिल्या जाणार्‍या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा अंश असल्याचा आरोप केल्यानंतर राजकारण पेटले आहे. प्रसादाच्या चाचणीचा अहवाल समोर आला असून त्यात चरबीचा आणि फिश ऑईलचे अंश आढळल्याचे नमूद करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी तेलगु देसम पार्टीने केला तर दुसरीकडे वायएसआर पक्षाने आरोप फेटाळले आहेत.

चंद्राबाबू नायडूंचा गंभीर आरोप
एनडीए आघाडीच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी मागील सरकारवर टीका केली. आधीच्या सरकारने तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये भेसळ केल्याचा गंभीर आरोप केला. चंद्राबाबू म्हणाले, तिरुपती देवस्थानात अतिशय निकृष्ट दर्जाचा प्रसाद तयार केला जायचा. याबाबत आम्ही आधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रसादच नव्हे तर ‘अन्नदानम’ अर्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याचा दर्जाही खालावला होता. त्यांनी देवस्थानातील पावित्र्य घालवलं.

तुपात आढळले चरबीचे अंश
तेलगु देसम पार्टीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत गुजरामधील प्रयोगशाळेत या प्रसादाची तपासणी केल्यानंतर अहवाल आल्याचे सांगितले. या लाडूमध्ये जे तुप वापरण्यात येते. त्या तुपात चरबीचे अंश सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे नमुने 9 जुलै 2024 आणि 16 जुलै रोजी घेण्यात आले होते.

चंद्राबाबू म्हणाले आम्ही दर्जा सुधारला
दरम्यान, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसवर आरोप केले होते. त्यांच्या काळात हा वापर होत होता असे त्यांनी सांगितले. आम्ही यात सुधारणा केलीय. आमचं सरकार आल्यापासून प्रसादासाठी शुद्ध तुपाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंदिरातर्फे दिल्या जाणार्‍या अन्नदानाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.

आरोपांमुळे भक्तांच्या भावना दुखावल्या
दरम्यान वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांची बहीण आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वायएस शर्मिला यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात राजकारण होत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार वाय.बी सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या आरोपाने भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हटले आहे.

 


कॉपी करू नका.