सीएसआर निधीत दुजाभाव : दीपनगरात आमदार खडसे यांच्या नेतृत्वात आंदोलन

आमदार संजय सावकारे यांच्या पत्रामुळे यापूर्वीचे टेंडर रद्द झाल्याचा आमदार खडसेंचा दावा

0

Misconduct in CSR Fund: Protest led by MLA Khadse in Deepnagar भुसावळ (21 सप्टेंबर 2024) : दीपनगर केंद्राने सीएसआर निधीत दुजाभाव केल्याच्या निषेधार्थ आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात बाधीत गावातील सरपंच व सदस्यांनी शुक्रवारी दीपनगर प्रकल्पाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याने खळबळ उडाली. आमदार खडसे यांनी यापूर्वीचे टेंडर आमदार संजय सावकारे यांच्या पत्रामुळे रद्द झाल्याचा व काही गावे निकषात नसतानाही टाकले गेल्याचा आरोप केला मात्र आमदारांनी आरोप फेटाळला.

या मागण्यांसाठी आंदोलन
सीएसआर निधीचे समान वितरण करावे, उदळी खुर्दला निधी उपलब्ध करुन द्यावा, वेल्हाळे गावासाठी अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांचे निवेदन दीपनगर प्रशासनाला देण्यात आले. वेल्हाळे गावासाठी 69 लाखांची कामे मंजूर होती मात्र आमदार संजय सावकारे यांनी पत्र दिल्यानंतर कामे रद्द करण्यात आली व नव्याने टेंडर काढण्यात आल्याचा आरोप आमदार खडसे यांनी केला.

यांचा आंदोलनात सहभाग
दीपनगर औष्णिक केंद्रातील अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शमले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष वाय.आर.पाटील, बाजार समितीचे संचालक योगेश पाटील, वेल्हाळे सरपंच शारदा कोल्हे, फुलगावचे उपसरपंच सिध्दार्थ चौधरी आदींसह जाडगाव, वेल्हाळे, उदळी खुर्दचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.

आमदार खडसेंचे आरोप निराधार : आमदार संजय सावकारे
आमदार खडसे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही शिवाय सीएसआर फंडाचे कोणतेही टेंडर आम्ही रद्द केलेले नाही. नवीन समाविष्ठ झालेली गावे त्यात वाढवून एकत्र टेंडर करावे यासाठी पत्र दिल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. मतदारसंघातील एकाही गावावर अन्याय होवू देणार नाही, असेही आमदार यावेळी म्हणाले.


कॉपी करू नका.