रावेरचा आखाडा वंचितच्या शमिभा पाटील गाजवणार : वंचितने 11 जागांवर उमेदवार केले जाहीर !
Vanchit’s Shamibha Patil will dominate Raver’s arena : Vanchit announced candidates for 11 seats! मुंबई (21 सप्टेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असतानाच दुसरीकडे वंचितने निवडणुकीपूर्वीच 11 उमेदवारांची नावे जाहीर करून आखाडा तापवण्यास सुरूवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभेच्या आखाड्यात शमिभा पाटील या तृतीयपंथी लेवा पाटील समाजातील उमेदवाराला उमेदवारी देवून वंचितने आव्हान निर्माण केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
या उमेदवारांना मिळाली संधी
सिंधखेडा राजा येथून सविता मुंढे, वाशीमधून मेघा किरण डोंगरे, धामनगाव रेल्वे येथून निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम येथून विनय भांगे, साकोली येथून डॉ. अविनाश नन्हे, नांदेड दक्षिण मधून फारुक अहमद, लोहा येथून शिवा नरंगले, औरंगाबाद पूर्व येथून विकास रावसाहेब दांडगे, शेगाव येथून किसन चव्हाण आणि खानापूर येथून संग्राम कृष्णा माने यांची वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे.

वंचितने त्यांच्या आघाडीमधील भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या उमेदवारांचीही घोषणा केली आहे. अनिल जाधव हे भारत आदिवासी पार्टीचे चोपडा येथून उमेदवार असतील. तर हरीश उके यांना रामटेकमधून उमेदवार दिली आहे.
ओबीसी आणि आदिवासी संघटनांना सोबत घेऊन ’वंचित’ची आघाडी
वंचितचे सर्वेसर्वा ड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याआधीच नव्या आघाडीचे संकेत दिले होते. ओबीसी आणि आदिवासी संघटनांना सोबत घेऊन आम्ही आघाडी स्थापन करणार आहोत. त्यामुळे या आघाडीत कोणाला यायचे असल्यास त्यांनी आमच्याकडे यावे, आम्ही कोणाकडे जाणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी ओबीसी आणि आदिवासी संघटनांना सोबत घेऊन आघाडी स्थापन करत उमेदवारांची घोषणादेखील केली आहे.
शमिभा पाटील यांचा थोडक्यात परिचय
शमिभा यांचे पूर्वीचे नाव श्याम मीना भानुदास पाटील असे होते. त्यांनी नंतर शमिभा नाव धारण केले. त्यांनी वयाच्या 30 व्या आपण तृतीयपंथी असल्याचे सार्वजनिक केले. शमिभा या उच्च शिक्षित असून त्यांनी मराठी विषयात एम.ए.केले आहे. सध्या त्या कवी ग्रेस यांच्या साहित्याचा पूर्वभ्यास यावर पी.एचडी करत आहे. त्यांनी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. शमिभा या सामाजिक कार्यकर्त्या असून तृतीयपंथीयांसाठी काम करतात. त्या तृतीयपंथीय हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आहेत. तसेच त्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीच्या सदस्या आहेत.




