नाथाभाऊ स्पष्टच म्हणाले ; भाजपात जाण्याचा प्रवेश बाप्पांबरोबर विसर्जीत झाला !
खडसे उवाच : गिरीश महाजनांना जागा दाखवण्याची ही ती वेळ : वेळोवेळी सभा घेवून भूमिका स्पष्ट
Nathabhau clearly said; Admission to BJP was canceled with Bappa! जामनेर (22 सप्टेंबर 2024) : माझा भाजपात होणारा प्रवेश हा गणपती बाप्पांबरोबर विसर्जित झाला असून यापुढे आपण आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार आहोत, अशी स्पष्टोक्ती आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे देत भाजपात परतण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी संकटमोचक मंत्री गिरीश महाजनांवर टिकेचे बाण चालवले. भाजपात आपण त्यांना आणले मात्र ती आपली मोठी चूक होती, असेही ते म्हणाले.
खडसेंची स्पष्टोक्ती ; राष्ट्रवादीतच राहणार
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार खडसे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी गळ्यात भाजपाचे मफलर टाकून भाजपात प्रवेश दिला मात्र फोटो समोर आले नसल्याचे आमदार खडसे अलीकडे म्हणलो होते मात्र भाजपात प्रवेश रखडल्यानंतर आमदार खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या मार्गावर फुली मारल्याचे जाहीर केल्यानंतर जामनेरात पुन्हा त्याबाबत विधान करीत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची भूमिका मांडली.

भाजपा प्रवेशाचा मार्ग बाप्पांबरोबरच विसर्जीत झाला
शरदचंद्र पवार गटाच्या कार्यक्रमात खडसे यांनी उपस्थिती दिली. मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे, सदस्य आहे आणि यापुढेही ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं खडसे म्हणाले. माझा भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला असल्याचं खडसे यावेळी म्हणाले.
मंत्री महाजनांनी विकास दाखवावा
आमदार खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ही निवडणूक आरपारची निवडणूक आहे. त्यावेळेस गिरीश महाजन माझे पाय धरायचे आणि सांगायचं की मला वाचवा. मी सभा घेतली त्यामुळे त्यावेळेस ते निवडून आले होते. आता गिरीश महाजन यांना आणून मी पाप केलं असं मला वाटतं. ज्याला मोठे केले, ते सद्गृहस्थ वाटले होते, त्याची अलीकडची वर्तणूक पाहिली की पाप केले असे वाटते. या मतदारसंघात मी काम केले आहे, आज सरकार कोणाचेही असले तरी त्याचे श्रेय आपले आहे. आज मंत्री असले तरी यांनी काय केले? असा सवाल खडसे यांनी गिरीश महाजन यांना या सभेत केला. आज गावात रस्ते नाही, मुतारी बंद, ग्रामविकास मंत्री तुम्ही तुमचे लक्ष कुठे? असे प्रश्नही त्यांनी गिरीश महाजन यांना विचारला.




