सीएसआर निधीत भुसावळ तालुक्यावर अन्याय होवू देणार नाही ! आमदार संजय सावकारे
तर सर्व गावांना समान निधी वाटपाची भूमिका : आमदार खडसेंना कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती पुरवल्याचा दावा
भुसावळ (22 सप्टेंबर 2024) : दीपनगर प्रकल्पातील सीएसआर निधी प्रकल्पापासूनच्या पाच किलोमीटर अंतरातील बाधीत गावांना मिळावा, अशी आपली भूमिका असून कुठल्याही परीस्थितीत या गावांवर अन्याय होवू देणार नाही व वेळ पडल्यास आंदोलनही छेडू, अशी स्पष्ट भूमिका आमदार संजय सावकारे यांनी शनिवार, 21 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत मांडली. आमदार खडसे यांनी आमदार सावकारे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर त्यांनी सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात पत्रकार परीषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली.
सर्व गावांना समान निधी द्यावा
कार्यकर्त्यांनी आमदार खडसे यांना चुकीच्या पद्धत्तीने माहिती पुरवल्याचा दावा आमदार सावकारे यांनी केला. निधी वाटपात तक्रारी असल्यास सर्व गावांना समान निधी वितरीत करावा, त्यास आपली हरकत नाही मात्र अन्याय खपवून घेणार नाही व प्रसंगी आंदोलन करण्यात येईल, असा पवित्राही त्यांनी बोलून दाखवला.

नियमाप्रमाणे व्हावे निधीचे वाटप
आमदार सावकारे म्हणाले की, वीज निर्मितीच्या नियमाप्रमाणे प्रकल्पाच्या पाच किलोमीटर अंतरातील बाधीत गावांना निधीचे वाटप होणे गरजेचे आहे, हा नियम आहे मात्र सीएसआरचा निधी तालुक्याव्यतिरीक्त दिला जात असल्याची तक्रार आपल्याकडे आली. नियमात नसलेल्या उदळी गावालाही निधी देण्यात आला मात्र त्याबाबतही आपले म्हणणे नाही. भुसावळ तालुक्यातील अंजलसोंडा, वरणगाव, कंडारी, साकरी, खडका आदी गावे पाच किलोमीटर अंतराच्या परिघात येत असल्याने या गावांना सीएसआर निधी मिळणे गैर नाही. आमदार एकनाथराव खडसे यांना काही कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली व त्यामुळेच कदाचित त्यांनी काल चुकीचा आरोप केला, असेही आमदार म्हणाले.
तर वेळ आल्यास आंदोलनही करणार
निधी वाटपात समानता असावी ही आपलीही मागणी असल्याचे आमदार यांनी सांगून उदळी बु.॥ गाव निकषात बसत नाही, असे दीपनगर प्रशासनाचे पत्र आहे मात्र त्यासदेखील आमचा विरोध नाही. पूर्वीचे झालेले सर्व टेंडर रद्द केल्यास सर्व गावांना समान निधीचे वाटप करावे, अशी आपली मागणी आहे व भुसावळ तालुक्यातील गावांवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होवू देणार नाही व वेळ पडल्यास त्यासाठी दीपनगर प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदारांनी दिला.




