चाळीसगाव जिल्हा निर्मितीसाठी एक पाऊल : अपर जिल्हाधिकारी कार्यालय होण्याच्या हालचालींना वेग

अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश : अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करून जनतेची जळगांव ये-जा व खर्चाचा होणारा त्रास थांबविणार :: आमदार मंगेशदादा चव्हाण


चाळीसगाव (23 सप्टेंबर 2024) : चाळीसगाव तालुकावासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने पाऊल पडले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांचा आजवरचा हा माईल स्टोन निर्णय ठरणार आहे. चाळीसगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास करतांना दूरदृष्टी ठेवत जनतेला जळगांव येथे 100 ते 150 किलोमीटर जाण्या-येण्याच्या होणार्‍या त्रासाची जाणीव असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती व अनुषंगाने सोमवारी प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिल्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश
चाळीसगाव तालुका भौगोलिकदृष्ट्या, लोकसंख्या तसेच प्रशासकीय दृष्ट्या जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका आहे. त्याकरिता विविध शासकीय विभागांनी त्यांचे जिल्हास्तरीय उप कार्यालय चाळीसगाव येथे सुरू केलेले आहेत. पोलीस विभागाचे देखील अपर पोलीस अधीक्षक कार्यालय चाळीसगाव येथे कार्यरत आहे. परिवहन विभागाने देखील उप प्रादेशिक कार्यालय सुरू आहे तसेच उपजिल्हा रुग्णालय देखील मंजूर करण्यात आलेले आहे मात्र जळगाव हे मुख्यालय असून जळगाव चाळीसगाव अंतर शंभर किलोमीटर हून अधिक आहे. तसेच तालुक्यातील खेडे पाडे वस्तीपासून जिल्ह्याचे अंतर दीडशे किलोमीटर पेक्षा अधिक आहे. त्यामुळे जमिनी संदर्भात अपील, तक्रारी व इतर न्यायालयीन न्याय निवाडे करण्यासाठी जळगाव येथे ये-जा करणे तालुक्यातील जनतेसाठी सोयीस्कर नाही, याकरिता चाळीसगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणे अत्यंत आवश्यक असून जनतेच्या सोयीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे जनतेला येणार्‍या श्रम व पैशाची बचत होणार आहे व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील प्रशासकीय कामकाजाचा ताण देखील काही प्रमाणात कमी होणार आहे असे पत्र आमदार चव्हाण यांनी मुंबई येथे मंत्रालयात दिले होते त्या अनुषंगाने आज दि 23 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी तत्काळ दाखल करण्याचे आदेश दिले आहे. शासन प्रस्ताव मंजूर होताच अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा होणार आहे.


बोलबच्चन करण्यावर नव्हे तर प्रत्यक्ष कृतीवर भर : आमदार मंगेशदादा चव्हाण
अपर जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगाव येथे सुरू करण्यात यावे यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनातून चाळीसगाव तालुक्यात विकास कामांची घोडदौड सुरू आहे. ध्येय प्राप्तीसाठी नुसत बोलबच्चन करून चालत नाही तर कृती करावी लागते. आता फक्त प्रतीक्षा अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्वप्न साकार होण्याची असल्याचे चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !