पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ करण्यात आलेल्या गोळीबारात आरोपी ठार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


ठाणे (23 सप्टेंबर 2024) : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदुक खेचून फायरिंग केली. या गोळीबारात एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर काही पोलिसही जखमी झाले आहेत. अक्षय शिंदेने फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ, बचावासाठी गोळीबार केला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.

विरोधकांकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे दुर्दैवी
मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षाकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, आक्षेप घेणं हे दुर्दैवी आहे. पोलिसांनी त्यांच्या बचावासाठी ही कारवाई केली आहे. याचा तपास होईल, चौकशी होईल.


’लहान मुलीवर अन्याय झाला, माणुसकीला काळीमा फासण्याचं कृत्य केलं, त्यावेळी विरोधक आरोपीला फाशीची मागणी करत होते. आता तेच विरोधक त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असतील तर हे दुर्दैव आहे, निंदाजनक आहे. एक पोलीस जखमी आहे, त्याचं विरोधी पक्षाला देणंघेणं नाही. जे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात, जे सण-वाराला रस्त्यावर पावसात, उन्हात, थंडीवार्‍यात उभे राहतात, त्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

पोलिसांनी स्वरक्षणार्थ झाडली गोळी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अक्षय शिंदेच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्या चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला नेण्यात येत होतं. त्यावेळी त्याने आधी पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने आधी पोलिसांवर फायरिंग केली, हवेत फायरिंग केली. त्यावेळी संरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर गोळी चालवली आहे. यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी अद्याप त्याच्या मृत्यूची अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू झाला आहे’, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !