धुळ्यातील अट्टल बुलेट चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात
संशयीताविरोधात लूटीसह चोरीचे आठ गुन्हे ः दोन वर्षांपूर्वी चोरलेली बुलेट जप्त
धुळे (25 सप्टेंबर 2024) : दुचाकी चोरी, जबरी लूट व चोरीचे तब्बल आठ गुन्हे दाखल असलेल्या व तीन वर्षांपासून पसार सराईत चोरट्याला धुळे गुन्हे शाखेने अटक करीत त्याच्याकडून दोन वर्षांपूर्वी चोरलेली बुलेट जप्त केली. आदिनाथ उर्फ गोल्या बोरसे (23, रा.दैठणकर नगर, देवपूर धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्याच्या देवपूर परिसरातील वाडीभोकर रस्त्यावरील श्रीराम कॉलनीतील कैलास कांजरेकर यांच्या मालकीची बुलेट (एम.एच.19 डी.सी.1115) ही 12 ऑक्टोबर 2022 रोजी चोरीला गेल्याने पश्चिम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेतील कर्मचारी चेतन बोरसे यांना ही चोरी संशयीत आदिनाथने केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली. संशयीत वाडीभोकर रोडवरील भिलाटी येथील देवमढी भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून कैलास कांजरेकर यांच्या मालकीची 40 हजार रुपये किंमतीची बुलेट जप्त करण्यात आली.
तीन वर्षांनंतर गवसला अट्टल आरोपी
आरोपी आदिनाथ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात चोरी, जबरी लूट, घरफोडीचे तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत तसेच देवपूर पोलीस ठाण्यात 392 च्या गुन्ह्यात आरोपी तीन वर्षांपासून वॉण्टेड होता मात्र त्याच्या अटकेनंतर यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, चेतन बोरसे, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, प्रल्हाद वाघ, धर्मेंद्र मोहिते आदींच्या पथकाने केली.