शिरपूर तालुक्यात तीन एकर गांजावर पोलिसांनी फिरवला कारवाईचा बुलडोजर
शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : ड्रोनद्वारे केली पाहणी
धुळे (25 सप्टेंबर 2024) : शिरपूर तालुका पोलिसांनी तब्बल तीन एकरावर फुलवलेल्या गांजा शेतीवर कारवाई केल्यानंतर गांजा तस्कर हादरले आहेत. लाकड्या हनुमान आणि रोहिणी गावादरम्यान असलेली ही गांजाची महाशेती शिरपूर तालुका पोलिसांनी शोधून काढत चौघांना बेड्या ठोकल्या. सुमारे 30 लाख रुपये किंमतीचा ओला गांजा जप्त करण्यात आला.
आधी आरोपी निष्पन्न व नंतर कारवाई
एरव्ही गांजा शेती वन जमिनीवर केली जात होती मात्र आरोपी गवसत नव्हते मात्र शिरपूर तालुका पोलिसांनी आधी चार आरोपी निष्पन्न करीत त्यांना ताब्यात घेत कारवाई केली. कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये ही गांजा शेती करण्यात आली तर काही ठिकाणी गांजाचे अखंड पट्टे लावलेले आढळून आले. सुरज कालुसिंग पावरा, रोहित सुबाराम पावरा, समीर बळीराम पावरा व रसीलाल हजाराम पावरा (रा.रोहिणी, ता.शिरपूर) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.





