आजच्या आधुनिक काळात लोक परंपरांची जपणूक गरजेची : भुसावळात भुलाबाई महोत्सवात आमदार संजय सावकारे ः
केशवस्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळाचा संयुक्त उपक्रम
In today’s modern times, preservation of folk traditions is necessary : MLA Sanjay Savkare at Bhulabai festival in Bhusawal भुसावळ (28 सप्टेंबर 2024) : बदलत्या आधूनिक काळात लोक परंपराची जपणूक गरजेची असून जुनी संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. काळानुरूप समाजाने परिवर्तन केले असलेतरी संस्कृती रक्षणासह परंपरा जपण्याची समाज म्हणून आपलीही जवाबदारी आहे. याच अनुषंगाने केशवस्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळाने राबवलेला ‘भुलाबाई महोत्सव’ हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. केशवस्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहरातील संतोषी माता सभागृहात शुक्रवार, 27 रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची विचार मंचावर उपस्थिती
प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. विचार मंचावर समुपदेशक आरती चौधरी, बियाणी एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ.संगीता बियाणी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे संचालक राहुल पवार, संयोजिका मनीषा खडके, इनरव्हीलच्या अध्यक्षा मीनाक्षी धांडे, राजश्री कात्यायनी, डॉ.नीलिता नेहते, प्रतिष्ठा महिला मंळडाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे आदींची उपस्थिती होती.

पूर्वापार परंपरा जपणे काळाची गरज
आमदार सावकारे म्हणाले की, आजच्या आधूनिक काळात शिक्षण निश्चितच अत्यावश्यक आहे मात्र पूर्वीच्या परंपरा लोप पावणार नाही व त्यांची जपणूक होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. भुलाबाई महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीची जोपासना करण्यात येत असल्याने हा उपक्रम कौतुकास्पद आहे. भुसावळात प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व केशवस्मृती प्रतिष्ठानने प्रतिष्ठा महिला मंडळाची या कार्यक्रमासाठी निवड केल्याने त्यांनी याबाबत कौतुक केले.
बंजारा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
भुलाबाई महोत्सवात भुसावळ तालुक्यातील महादेव माळ भागातील बंजारा समाजाच्या महिलांनी विशेष सहभाग नोंदवला. एरव्ही शेती-मातीशी निगडीत असलेल्या या समाजातील महिलांनी बंजारा बोलीभाषेत भूलाबाईंचे गाणे सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते वय वर्ष 75 ते 80 वयोगटातील आजीबाईंनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत दाद मिळवली. कधीही मंचावर सादरीकरण न करणार्या बंजारा समाजातील या महिलांना विशेष पारितोषिक देवून मान्यरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
भुसावळ तालुक्यातील 32 संघांनी नोंदवला सहभाग
भुलाबाई महोत्सवात प्रथम विजेत्या संघाला 5100, द्वितीय 3100 व तृतीय 2100 तर उत्तेजनार्थ 1100 रुपयांचे बक्षीस देण्यात आले तसेच प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले. लहान गटासाठी परीक्षक म्हणून दीपा पटेल व अपूर्वा फेगडे व मोठ्या व खुल्या गटासाठी रमाकांत भालेराव, मुकेश खपली यांचे सहकार्य लाभले. शहर व तालुक्यातील एकूण 32 संघांनी यात सहभाग नोंदवला.
उत्कृष्ट नियोजन व कौतुकास्पद उपक्रम
मनीषा खडके म्हणाल्या की, गेल्या 22 वर्षांपासून जळगावात भुलाबाई महोत्सव घेण्यात येतो मात्र जळगावप्रमाणेच भुसावळातही अत्यंत नियोजनपूर्वक व उत्कृष्ट असा कार्यक्रम पार पडल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. विजेत्या गटाने 29 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांनी आवाहन केले.




