भुसावळ विधानसभा निवडणुकीत उच्चशिक्षीत डॉ.राजेश मानवतकरांच्या उमेदवारीने चुरस
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मागितली उमेदवारी
Bhusawal Vidhan Sabha elections with the candidacy of highly educated Dr. Rajesh Manavatkar भुसावळ (29 सप्टेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या पंधरवड्यात जारी होण्याची शक्यता असताना दुसरीकडे भुसावळात विधानसभा निवडणुकीचा आखाडा इच्छुकांमुळे तापण्यास सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डॉ.राजेश मानवतकर यांनी उमेदवारी मागितली असून ‘संकल्प नव्या विचारांचा’ या टॅग लाईनने सोशल मिडीयाच्या माध्यमातून थेट प्रचाराला सुरूवात केली आहे तर भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे या निवडणुकीत विजयाच्या चौकारासाठी सज्ज झाले आहेत.
शरद पवारांचे घेतले आशीर्वाद
भुसावळातील उच्चशिक्षीत डॉ.राजेश मानवतकर हे हृदयरोग तज्ज्ञ असून वैद्यकीय सेवेमुळे शहरासह भुसावळ तालुक्याला ते परिचीत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मागितली आहे. अलीकडेच त्यांनी 13 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईत सुप्रीमो शरद पवारांची भेट घेत आशीर्वाद घेतले आहे. डॉ.मानवतकर यांचे शिक्षण एमबीबीएस एम.डी.बी.जे.मेडीकल, पुणे येथे झाले असून प्राथमिक शिक्षण फुलगाव व माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव येथे झाले आहे तर भुसावळात 1 डिसेंबर 2004 पासून सेवा देत आहेत. वैद्यकीय सेवेमुळे हे कुटूंब शहरासह तालुक्याला पूर्णपणे परीचीत आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून डॉ.मधू मानवतकर रिंगणात
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ.राजेश यांच्या सौभाग्यवती डॉ.मधू मानवतकर या अपक्ष म्हणून विधानसभेच्या आखाड्यात उतरल्या होत्या मात्र अल्प कालावधीत मिळूनही त्यांनी दुसर्या क्रमांकाची मते घेतली. त्यावेळी त्यांना 28 हजार 675 मते मिळाली होती. या कुटूंबाला राजकीय वारसा नसतानाही त्यांनी मिळवलेले यश निश्चितच कौतुकास पात्र होते. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत डॉ.राजेश मानवतकर यांना उमेदवारी मिळाल्यास निवडणुकीत निश्चितपणे चुरस निर्माण होणार आहे.
भुसावळात इच्छुकांचे वाढले लॉबींग
भुसावळ विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर शहरातून अनेक इच्छुकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा केला आहे. भुसावळची जागा महाआघाडीतील मित्रपक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सुटेल, असा विश्वास पीआरपीचे नेते जगन सोनवणे यांना आहे तर काँग्रेसकडून अॅड.प्रवीण सुरवाडे, शहराध्यक्ष रवींद्र निकम, शहराध्यक्ष शैलेश बोदडे, सागर वानखेडे, प्रा.मनोहर संदानशीवदेखील इच्छूक आहेत तर भाजपाकडून आमदार सावकारेंसोबतच माजी शहराध्यक्ष लक्ष्मणराव सोयंके, प्रभाकर जाधव व दोन ते तीन नावे चर्चेत आहेत तसेच शिवसेना उबाठा गटाकडून प्रीती तोरण महाजनदेखील इच्छूक आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळाल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत.




