कोकणात शिवरायांचा पुतळा पडला नव्हे पाडण्यात आल्याचा संशय : भुसावळात अॅड.प्रकाश आंबेडकरांचा दावा
आगामी निवडणूक आरक्षणाभोवती फिरणार : वंचित सर्व जागांवर लढणार
Upcoming elections will revolve around reservation : the deprived will fight on all seats भुसावळ (30 सप्टेंबर 2024) : कोकणातील राजकोटमधील शिवरायांचा पुतळा पडला म्हणण्याऐवजी तो पाडण्यात आला, असा आपला संशय असून चौकशी यंत्रणांनी याबाबत सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी भुसावळात व्यक्त केले. चोपडा येथे सोमवारी होत असलेल्या आदिवासी सत्ता परिवर्तन परिषदेसाठी अॅड.आंबेकडर जिल्हा दौर्यावर आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला.
मातीच्या जागेवर पुतळे अद्यापही शाबूत
अॅड.आंबेडकर म्हणाले की, राज्यभरात आम्ही मातीच्या जागेवर छत्रपती शिवरायांचे पुतळे उभे केलेले पाहिले. ऊन, वारा व पावसात या पुतळ्यांना कुठलीही हानी झाली नाही मात्र कोकणात राजकोटमध्ये उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा ब्रांझ धातूचा कोसळला म्हणण्याऐवजी तो पाडण्यात आल्याचा संशय आहे. चौकशी यंत्रणांनी याबाबत चौकशी केल्यास निश्चित सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला.

आगामी निवडणुका आरक्षणाभोवती
शरद पवारांनी रत्नागिरीत जरांगे पाटील यांच्या मागणीला समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे एनसीपीची तीच भूमिका आहे हे यातून स्पष्ट होते. वंचित आरक्षण भूमिकेच्या विरोधात नाही मात्र ओबीसींच्या आरक्षणााला धक्का लागू नये व मराठा समाजाला सरकारने वेगळे आरक्षण द्यावे. आगामी काळात होणार्या निवडणुका या आरक्षणाभोवतीच फिरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. वंचित आगामी निवडणुकीत सर्व जागांवर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला वंचितच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




