शिंदे सरकारचा मोठा निर्णय : देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’


मुंबई (01 ऑक्टोबर 2024) : शिंदे सरकारने राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत देशी गायीला राज्यमाता-गोमाता म्हणण्याबाबत निर्णय घेतला आहे. सोमवारी मंत्री मंडळाची बैठक होवून त्यात शासन निर्णय (जीआर) राज्य सरकारने काढला.

भाजपाने केले निर्णयाचे स्वागत
गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे म्हटले जाते. राज्यातील विविध भागांत विविध प्रकारच्या देशी गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी, विदर्भात गवळाऊ देशी गायी आहेत. राज्यातील सर्वच देशी गायींना राज्यमाता-गोमाता असे आता संबोधण्यात येणार आहे. प्रदेश भाजपने निर्णयाचे स्वागत केले आहे.

दोन तासांत 38 निर्णय
मागील आठवड्यात मंत्रीमंडळ बैठकीत 35 निर्णय झाले होते व सोमवारच्या कार्यक्रम पत्रिकेवर सात विषय होते मात्र आयत्या वेळी 36 विषय आणून अवघ्या दोन तासांत 38 निर्णय घेण्यात आले. त्यात कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान, होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचेही निर्णय घेण्यात आला.

गोशाळांना अनुदान
गोशाळांमधील देशी गाईंच्या पालन पोषणासाठी प्रति दिवस प्रति गाय 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्री मंडळाने घेतला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिक अडचणी येतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल.


कॉपी करू नका.