शस्त्राच्या धाकावर बकर्‍यांची चोरी : टोळी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Theft of goats at gunpoint: Gang in Jalgaon Crime Branch’s net जळगाव (06 ऑक्टोबर 2024) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धारदार शस्त्राचा धाक दाखवून 19 बोकड व सात बकर्‍यांची चोरी करणार्‍या टोळीला ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख 35 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

शस्त्राच्या धाकावर पाळीव प्राण्यांची लूट
चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे गावातील एका झोपडीच्या ठिकाणी टोळीने धारदार शस्त्राचा धाक दाखवत 19 बोकड व 7 बकर्‍या चारचाकी वाहनात टाकून चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावातील चेतन गायकवाड यांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

टेाळीच्या आवळल्या मुसक्या
पथकाने गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी भवाळी गावात जाऊन चेतन गायकवाड व त्यांचे साथीदार यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही चोरी चेतन गायकवाड यांच्यासह त्याचे साथीदार गोरख फकीरा गायकवाड, बबलू आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे (सर्व रा.भवानी, ता.चाळीसगाव) यांच्यासोबत केल्याचे सांगितले. यातील गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे हे दोघे पसार झाले. उर्वरित पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि रोकड असा एकूण एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, हिरालाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी यांनी केली आहे. अटकेतील पाचही जणांना पुढील चौकशीसाठी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !