नारीशक्तीला अन्याय-अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ दे : अॅड.रोहिणी खडसे
मुक्ताईनगर (07 ऑक्टोबर 2024) : राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणी खडसे यांच्या संवेदना फाउंडेशनच्या सौजन्याने नवरात्री आणि आदिशक्ती मुक्ताईच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीच्या अब्जचंडी श्री दुर्गा सप्तशती पाठ पारायण सेवेत संकल्पित होऊन श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे अर्ध्वयू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने श्री संत गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर येथे श्री दुर्गा सप्तशती पाठ पारायणाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी 300 महिला भगिनींनी पारायण सोहळ्यात सहभागी झाल्या व त्यांनी दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण केले. दुर्गा सप्तशती पाठाच्या मंत्रोपचाराच्या पठणाने परीसरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. सहभागी झालेल्या महिलांना अॅड.रोहिणी खडसे यांच्या तर्फे श्री दुर्गा सप्तशती पाठ ग्रंथाचे वितरण करण्यात आले. आज दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करून आदिशक्ती दुर्गा माता आणि मुक्ताईला संपूर्ण नारीशक्तीला अन्याय-अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ दे आणि सर्वांना सुख समृद्धी निरोगी दीर्घायुष्य मिळू दे, अशी प्रार्थना केल्याचे अॅड.रोहिणी खडसे यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी शिवाजी वंजारी, व्ही.डी.पाटील, प्राजक्ता चौधरी, जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.





