वरणगाव नागेश्वर रेल्वे पुलाखालील रस्त्यासाठी पाण्यात बसून ‘रास्ता रोको’

काम न झाल्यास दिवाळीच्या दिवशी आंदोलन ! : माजी नगराध्यक्ष सुनील काळे


‘Rasta Roko’ sitting in water for road under Varangaon Nageshwar railway bridge वरणगाव (07 ऑक्टोबर 2024) : वरणगाव शहराजवळील तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळी ल रेल्वे पुलाखाली पाणी साचत असल्याने तिथे रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांसह भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वे पुलाखालील पाणी काढावे, रस्ता दुरुस्त करावा तसेच तिरंगा सर्कल ते रेल्वे स्टेशनपर्यंत उर्वरित दुभाजकाचे काम करावे, मध्यभागी लाईट टाकण्यात यावे, सिद्धेश्वर नगरात जाण्यासाठी अंतर्गत अंडर बायपास करण्यात यावा, बोदवडकडे जाण्यासाठी उड्डाणपूल करावा आदी मागण्यांसाठी सोमवार, 7 रोजी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास दिवाळीच्या दिवशी पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

पाण्याच्या डबक्यात बसून निषेध
वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अकलाख, भाजपाचे अध्यक्ष सुनील माळी, मिलिंद भैसे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, सरचिटणीस योगेश माळी, शहराध्यक्ष आकाश निमकर, ग्राहक संघटनेचे अध्यक्ष हितेश चौधरी, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, कृष्णा महाजन, बळीराम सोनवणे, नामदेव सोनवणे, पहेलवान, ऋषिकेश महाजन यांच्या नेतृत्वात साचलेल्या पाण्यात बसून शेकडो लोकांनी आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थी, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


आठ दिवसात समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन
दोन तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपकार्यकारी अभियंता सी.के.तायडे यांनी स्वतः भेट देऊन रेल्वे पुलाखालील साचत असलेले पाणी व रस्ता आठ दिवसात दुरुस्त करून देण्याचे तसेच तिरंगा सर्कल रेल्वे स्टेशनपर्यंत उर्वरीत दुभाजकाचे काम व लाईट टाकण्याचे काम दहा दिवसात करून देण्याचे लेखी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मागण्या पूर्ण न झाल्यास दिवाळीच्या दिवशी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला.

जोरदार घोषणाबाजी : वाहतूक ठप्प
आंदोलनामुळे वाहनांची प्रचंड गर्दी जमली. रेल्वे पुलाखालील रस्त्यावरील पाणी निघालेच पाहिजे व तिरंगा सर्कल ते रेल्वे स्टेशन उर्वरित दुभाजकाचे काम करून मध्यभागी दिवाळीत लाईट लागलेच लागले पाहिजे आदी घोषणा देऊन वातावरण तापवण्यात आले. वरणगाव पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. वरणगावचे पीएसआय प्रशांत सोनवणे, पोलीस श्रावण जवरे-बाविस्कर यांच्यासह प्रवासी संघटनेचे मुस्लीम भाई अन्सारी, डॉ.सादीक शेख, अजमल भाई, फजल भाई, सरपंच पिंपळगाव लक्ष्मण पाटील, ऋषिकेश महाजन, निलेश पाटील यांच्यासह माजी प्राचार्य के.एम.पाटील, दत्तात्रय सूर्यवंशी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !