स्व-संरक्षणातून महिलांनी सबला असल्याचे दाखवून द्यावे : अ‍ॅड.रोहिणी खडसे

कुर्‍हा गावात संवेदना फाउंडेशनतर्फे स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर


मुक्ताईनगर (08 ऑक्टोबर 2024) : देशातील महिला अत्याचाराच्या घटना पाहता महिलांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक वेळी कोणी मदतीला येईलच, असे नाही त्यासाठी प्रत्येक महिलेने स्वतः चे स्व संरक्षण करता यावे यासाठी स्व-संरक्षणाचे धडे आत्मसात करून स्वयंसिद्धा बनण्याची गरज निर्माण झाली आहे. स्व-संरक्षणातून महिलांनी सबला असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी केले.

अ‍ॅड.खडसे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे कुर्‍हा गावातील शिवाजी हायस्कूल व कै.ग.स.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना राजेंद्र जंजाळ यांनी स्व.संरक्षणाचे प्रशिक्षण देत सहभागाबद्दल प्रमाणपत्र दिले.


अत्याचारात वाढ : स्त्रीने सक्षम व्हावे
अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, स्त्री ही संपूर्ण जीवसृष्टीच्या निर्मिती व संगोपनात नेहमीच मोलाचा वाटा उचलत आली आहे. भारतीय संस्कृती, समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, नागरी व्यवस्था, अर्थव्यवस्था, तथा भारतीयांच्या जीवनात तिने नेहमीच अतुलनीय भूमिका बजावली आहे. एका जिवाच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत ती सातत्याने वेगवेगळ्या भूमिकांमधून आपले योगदान सक्षमपणे देत असते. परंतु बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत आज तिच्या सुरक्षितते बाबत काही गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत.

महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अनपेक्षित निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्याकरिता व निर्माण होणार्‍या प्रसंगाला निर्भीडपणे तोंड देऊन नराधमांपासून स्व-संरक्षण करण्याची क्षमता निर्माण होण्याकरिता स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करणे माता भगिनींकरता अत्यावश्यक आहे. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.बी.पाटील, अमोल गावंडे, एम.एस.पाटील, काकडे, जे.एस.पाटील, व्ही.व्ही.पाटील मॅडम, वाडेकर, व्ही.एस.पाटील, एच.के.पाटील, दोरकर, बोडखे आदींनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !