उद्योगसूर्य रतन टाटा कालवश
Udyogsurya Ratan Tata Kalvash मुंबई (10 ऑक्टोबर 2024) : प्रसिद्ध उद्योगपती तथा टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्तीचे प्रयत्न सुरू असताना रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री उशिरा टाटा सन्सचे चेअरमन एन.चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.
रात्री उशिरा केले मृत जाहीर
रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सुरुवातीला रक्तदाबाचा त्रास होत. मात्र त्यानंतर त्यांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये कोणत्याही विशेष आजाराचे निदान झाले नव्हते मात्र त्यानंतर काही कालावधीने त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. रुग्णलायतील वरिष्ठ डॉक्टरच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर बुधवारी रात्री ते उपचाराला कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे कळल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात येणार !
रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनासाठी गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 3.30 या वेळेत एनसीपीए येथे ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली.
21 वर्षे टाटा समूहाचे अध्यक्ष
जेआरडी टाटा यांच्यानंतर रतन टाटा यांनी 1991 मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. जगातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कंपनीचे ते जवळपास 21 वर्षे अध्यक्ष होते. आयुष्यातील तब्बल सहा दशके ते टाटा कंपनीशी निगडित राहिले. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत टाटा समूहाच्या कंपन्या आघाडीवर आहेत. 80 हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे.
रतन टाटा अध्यक्ष असताना टाटा समूहाचा जगात झाला मोठा विस्तार
उद्योगपती रतन नवल टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. ते 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष व ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017पर्यंत अंतरिम अध्यक्ष होते. ते टाटा समूहाच्या ट्रस्टचेही प्रमुख होते. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी दत्तक घेतलेले नवल टाटा यांचे रतन टाटा हे पुत्र होते. कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेजमधून त्यांनी आर्किटेक्चर विषयातील पदवी मिळविली. त्यानंतर टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर त्यांनी काम केले. जेआरडी टाटा यांनी सेवानिवृत्ती पत्करल्यानंतर टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा अध्यक्ष बनले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने टेटली, जग्वार लँड रोव्हर, कोरस या कंपन्यांचे अधिग्रहण केले. त्यामुळे जगभरात टाटा उद्योग समूहाचा विस्तार होण्यास आणखी चालना मिळाली. टाटा उद्योग समूह हा समाजहिताची कामे करणारा व दानशूर वृत्तीचा म्हणून जगभरात ख्यातनाम आहे.