हरियाणातील निकालानंतर काँग्रेसचे ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह : तक्रार असलेल्या ईव्हीएम सीलबंदची मागणी !


नवी दिल्ली (10 ऑक्टोबर 2024) : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेस आणि केंद्रीय निवडणूक आयोग आमने-सामने आले आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत काँग्रेसने याप्रकरणी तपास करण्याची आणि तपास पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम सील करण्याची विनंती आयोगाला केली तर दुसरीकडे आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवत काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे.

आयोगाची घेतली भेट
हरियाणा विधानसभा निकालावरून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयोगाची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेस संघटनेचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, महासचिव जयराम रमेश, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष उदय भान, पंजाब विधानसभेतील विरोधी पक्ष नेते प्रताप सिंह बाजवा व काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा यांचा समावेश होता.

ईव्हीएममध्ये फेरफारचा केला आरोप
शिष्टमंडळाने सात तक्रारींचे एक निवेदन आयोगाला दिले. आयोगाकडे जवळपास 20 तक्रारी करण्यात आल्या असून यापैकी सात तक्रारी लेखी असल्याचे खेडा यांनी सांगितले. यात ईव्हीएममध्ये फेरफार, चार्जिंग आणि मतमोजणीत विलंब यासारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. दुसरीकडे आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले आहे. निकाल अमान्य असल्यासंबंधीचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे वक्तव्य देशाच्या समृद्ध लोकशाहीच्या इतिहासात यापूर्वी कधीही ऐकण्यात आले नाही. अशा प्रकारचे वक्तव्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक सीमेपलीकडचे असल्याचे आयोगाने म्हटले.

 


कॉपी करू नका.