हरियाणा निकालाने निराश झालेल्यांनी जम्मू-कश्मीरच्या विजयाकडे आशेने पहावे : ठाकरे गटाचा हल्लाबोल


मुंबई (10 ऑक्टोबर 2024) : मराठी माणूस मनाने लेचापेचा नाही. तो विचाराने पक्का आहे. हरियाणाच्या निकालाने जे निराश झाले त्यांनी जम्मू-कश्मीरच्या विजयाकडे आशेने पाहायला हवे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने अग्रलेखातून केला आहे. भाजपच्या पिपाण्या कितीही वाजल्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातही मतविभागणीचा ‘खेला’ करायचा व फाटाफूट घडवून निवडणुका जिंकायच्या हाच भाजप व त्यांच्या शिंदेंचा डाव आहे. महाराष्ट्रातही हरियाणाप्रमाणेच घडेल, असे फडणवीस वगैरे लोक म्हणतात ते यासाठीच.

हरियाणा-महाराष्ट्राचे गणित वेगळे
हरियाणा व महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीची तुलना करणे सर्वस्वी चुकीचे आहे. हरियाणातील गणितापेक्षा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे गणित वेगळे आहे. हरियाणा 90 सदस्यांची विधानसभा आहे. महाराष्ट्र 288 आमदारांचे व 48 खासदारांचे राज्य आहे. महाराष्ट्राला स्वतःचे मन व मत आहे. हरियाणात भाजप निवडणुका जिंकला हे सत्य आहे, पण सत्य मार्गाने त्यांनी हा जय प्राप्त केला काय? हा आता चर्चेचा विषय आहे. जम्मू-कश्मीरच्या पराभवाची चर्चा होत नाही, पण हरियाणा विजयाचे ढोल वाजवले जात आहेत. आता फडणवीस वगैरे ‘पिपाण्या’ वाजवत आहेत की, महाराष्ट्रात हरियाणाप्रमाणे होईल. मग काय हो फडणवीस, तुमच्या त्या हरियाणाचा विजय तूर्त ठेवा बाजूला. महाराष्ट्र जम्मू-कश्मीरप्रमाणेच निकाल देईल, असे तुम्ही-आम्ही का म्हणू नये? जम्मू-कश्मीरात इंडिया आघाडीचा विजय झाला. त्याप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच विजय होईल.


जनतेत मोदी-शहांविरुद्ध टोकाची चीड
हरियाणात जाट विरुद्ध सर्व बिगर जाट असा सामना झाला. महाराष्ट्रात भाजपास असेच जातीय गणित मांडून निवडणुका लढायच्या आहेत. राज्यात मराठा, धनगर, ओबीसी असा आरक्षणाचा तिरंगी लढा सुरू आहे व जो तो आपापल्या पद्धतीने या आंदोलनातील सोंगट्या हलवीत आहे. पुन्हा निवडणुकांच्या तोंडावर सरकारच्या तिजोर्‍या (रिकाम्या असल्या तरी) कोणासाठी रिकाम्या होतील त्याचा नेम नाही. मात्र एवढा आटापिटा करूनही महाराष्ट्राची जनता विद्यमान सत्ताधार्‍यांना त्यांची जागा दाखविणार हे नक्की आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेत मोदी-शहांविरुद्ध टोकाची चीड आहे. स्वतः फडणवीस यांची पत कमालीची घसरली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीतील त्यांच्या पातशहांना थेट थैल्या पोहोचवतात व या थैल्या फडणवीस वगैरे लोकांपेक्षा जास्त आहेत.

मुंबई-महाराष्ट्राची लूट करून दिल्लीच्या पातशहांना खंडण्या ओतल्या जात आहेत व त्यात मर्‍हाठी जनतेचे अतोनात नुकसान आहे. हे सर्व मराठी जनता पाहत आहे. महाराष्ट्रात गद्दारांचे शासन आहे व मोदी-शहांनी हे बेकायदेशीर, बेइमान शासन महाराष्ट्राच्या छाताडावर बसवले. राज्यातील जनतेला हे मान्य नाही. लोकसभा निवडणुकीत याच संतापाचे प्रतिबिंब दिसले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !