राज्यात पुन्हा परतीचा : आज जळगावसह 25 जिल्ह्यात पावसाची शक्यता
जळगाव (11 ऑक्टोबर 2024) : एकीकडे राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असताना यातच परतीच्या पावसाचे ढग दाटून आले आहे. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाट आणि वार्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्याचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे पावसाने दांडिया आणि गरब्याचा देखील खेळ बिघडवला. दरम्यान, आज जळगावसह राज्यात 25 जिल्ह्यांना पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. शेतकर्यांनी खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकले असून गोव्याच्या किनार्यालगत सक्रिय झाले आहे. परिणामी वायव्येकडे जाताना या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वार्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवस राज्यात परतीचा पाऊस चांगलाच धुमाकूळ घालणार, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

आज शुक्रवारी जळगावसह राज्यातील 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे. शेतकर्यांनी खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
हवामान खात्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, मुंबई, नवी मुंबईसह पालघर, ठाण्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकले असून गोव्याच्या किनार्यालगत सक्रिय झाले आहे.




