महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी : तिसर्‍या आघाडीचे आमदार बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


मुंबई (15 ऑक्टोबर 2024) : तिसर्‍या आघाडीचे नेते तथा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उभय दोन्ही नेत्यांत जवळपास तासभर चर्चा झाली. त्यात शिंदे यांनी तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडलेल्या बच्चू कडू यांना पुन्हा सोबत घेण्यासाठी त्यांची समजूत काढल्याची चर्चा आहे मात्र चर्चेचा तपशील बाहेर येवू शकला नाही.

बच्चू कडू यांची काढली समजूत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे. परिवर्तन महाशक्ती अर्थात तिसर्‍या आघाडीचे प्रमुख नेते बच्चू कडू मंगळवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. याठिकाणी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते संजय शिरसाट, आनंदराव अडसूळ व प्रताप सरनाईक उपस्थित आहेत. त्यात बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.


गत महिन्यात स्थापन केली होती तिसरी आघाडी
बच्चू कडू यांनी गेल्याच महिन्यात राजू शेट्टी, युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मदतीने परिवर्तन महाशक्तीची घोषणा केली होती. तिसर्‍या आघाडीच्या रुपात आपण मतदारांना पर्याय देणार असल्याचे त्यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात सांगितले होते.

बच्चू कडू यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. पण त्यानंतर 2022 मध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. या बंडाला शिवसेनेच्या 40 आमदारांसह काही अपक्षांनी साथ दिली. बच्चू कडूंच्या प्रहारनेही शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या सरकारमध्ये कडू यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यांना केवळ दिव्यांग कल्याण मंडळाची जबाबदारी दिली गेली. यामुळे बच्चू कडू शिवसेनेवर नाराज आहेत. या नाराजीतूनच बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या रुपात तिसर्‍या आघाडीचा प्रयोग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !