महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक : 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल


मुंबई (15 ऑक्टोबर 2024) : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असून त्यात महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केले आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात निवडणुका तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.

29 पर्यंत माघार घेता येणार
राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 29 ऑक्टोबर हा असेल तर 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येईल. उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यामध्ये 234 सर्वसाधारण मतदारसंघ असून 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

मतदार हेल्प लाईनच्या आधारे मतदार आपल्या मतदान केंद्रासह इतर माहिती मिळवू शकतात.

मतदान केंद्रांवर मतदारसंघांसाठी पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील.

निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी पथकाद्वारे तपासणी केली जाईल.

ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना आपल्याबाबत तीनदा वृत्तपत्रांतून माहिती द्यावी लागेल.

दरम्यान, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. तसंच महायुती आणि महाविकास आघाडी या नावांनीतयारी झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, याबाबत देशभरात उत्सुकता आहे.


कॉपी करू नका.