विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला 40 लाखांपर्यंत करता येणार खर्च !
रावेर प्रांताधिकारी बबनराव काकडे : झेंड्यांसह बॅनर काढण्याचे आदेश
A candidate can spend up to 40 lakhs in the assembly elections! रावेर (15 ऑक्टोबर 2024) : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रशासन झपाटून कामाला लागले आहे. यंदा विधानसभा उमेदवाराला 12 लाख रुपये अधिक खर्चाची मुभा मिळाली असून 40 लाखांपर्यंत त्यास खर्च करता येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी पत्रकार पारिषदेत दिली. मंगळवारी दुपारी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याची विधान सभेच्या 288 जागांसाठी एकाच दिवशी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सायंकाळी काकडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आता खर्च मर्यादा 40 लाख
तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेत बबनराव काकडे यांनी सांगितले की, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय पक्षाचे डिजिटल बॅनर, पोस्टर काढण्याचे आदेश नगरपालिका, ग्रामपंचायती व राजकीय पक्षांना देण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी मागील पंचवार्षिक निवडणूकीत उमेदवारांना प्रचाराची खर्च मर्यादा 28 लाख होती आता ती खर्च मर्यादा 40 लाख झाली आहे.

29 पर्यंत करता येणार मतदार नोंदणी
रावेर विधानसभेत तीन लाख आठ हजार 209 मतदार असून त्यात एक लाख 57 हजार 808 पुरूष तर एक लाख 50 हजार 378 महिला मतदार आहेत. 85 वर्षावरील मतदार तीन हजार 197, दिव्यांग एक हजार 685, सैन्य दलातील मतदार 268, तृतीयपंथी दोन मतदारांचा समावेश आहे. 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदाराला 29 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल.
328 मतदार केंद्र
रावेर विधानसभा मतदार संघात 328 मतदान केंद्र आहेत. यासाठी दोन हजार 700 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे तीन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. बीएलओ मार्फत व्होटर स्लिप मतदारांना देण्यात येईल. रावेर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून मतमोजणीची प्रक्रिया येथील तहसील कार्यालयात होईल. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बी.ए.कापसे, सहायक गटशिक्षणाधिकारी के.पी.वानखेडे उपस्थित होते.




