भुसावळात आमदार संजय सावकारे तर जळगावातून आमदार राजूमामा भोळे भाजपाचे उमेदवार !

रावेरात अमोल जावळेंना संधी तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावीत भाजपा उमेदवार


Bhusawla MLA Sanjay Savkare and Jalgaon MLA Rajumama Bhole BJP candidate ! मुंबई (17 ऑक्टोबर 2024) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंरबर रोजी होत असून दुसरीकडे उमेदवारी निश्चितीवर महायुती व महाविकास आघाडीत खल सुरू आहे मात्र समजलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांनाच भाजपाकडून संधी मिळणार असून त्यात भुसावळात भाजपाचे आमदार संजय सावकारे तर जळगावात आमदार राजूमामा भोळे यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

10 नावांवर शिक्कामोर्तब ?
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कोण किती जागांवर निवडणूक लढवेल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आज महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीमधील जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचे समजते व यावेळी 120 नावांवर अंतिम निर्णय होणार आहे. तत्पूर्वी भाजपकडून 25 उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली असून 10 मतदारसंघातील नावांवर शिक्कामोर्तबही झाल्याचे समजते.

जळगावात आमदार भोळे यांना पुन्हा उमेदवारी
जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांना पुन्हा एकदा जळगाव शहर मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. आमदार राजूमामा भोळे यांनी 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला संधी मिळेल? याकडे लक्ष लागून होते परंतु भाजपने पहिल्या दहा उमेदवारांच्या नावात आमदार राजूमामा भोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची प्राथमिक माहिती आहे.

भुसावळात आमदार संजय सावकारेच उमेदवार
सलग तीन टर्म आमदार राहिलेले आमदार संजय सावकारे यंदा विजयाचा चौकारासाठी रिंगणात उतरले असून त्यांनाच भाजपाकडून तिकीट मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

रावेरात अमोल जावळेंना संधी
रावेर विधानसभेतून स्व.हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे व पहिल्याच यादीत त्यांनाही स्थान असेल, अशीदेखील चर्चा आहे.

राज्यात यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मनसे देखील स्वतंत्रपणे लढणार आहे तर राज्यात तिसरी आघाडी देखील उदयास आल्यामुळे राज्यात कांटे की टक्कर होईल, असे आजतरी राजकीय चित्र आहे.

पहिल्या दहा उमेदवारांमध्ये यांचा समावेश ?
नंदुरबार- विजयकुमार गावीत
कोथरूड- चंद्रकांत पाटील
नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस
धुळे ग्रामीण- सुभाष भामरे
धुळे शहर- अनुप अग्रवाल
रावेर- अमोल जावळे
भुसावळ- संजय सावकारे
जळगाव- सुरेश भोळे
शहादा- राजेश पाडवी
सिंदखेडा- जयकुमार रावल

दरम्यान, समजलेल्या माहितीनुसार, वरील उमेदवारांची नावे भाजपाच्या पहिल्या यादीत असू शकतात मात्र लवकरच भाजपाकडून उमेदवार निवडीची घोषणा आज वा उद्या केली जाणार असल्याने त्यानंतर अधिकृतरीत्या उमेदवारांची नावे समोर येणार आहेत.


कॉपी करू नका.