दिल्लीत बैठकांचे सत्र : भाजपाची पहिली यादी आज जारी होणार ?


नवी दिल्ली (18 ऑक्टोबर 2024) : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. भाजपाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकांचे सत्र सुरू असून शुक्रवार, 18 रोजी पहिली यादी जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अथवा शनिवार, 19 रोजी यादी समोर येईल, असेदेखील सूत्रांनी सांगितले. 115 जणांच्या नावांची यादी सादर करण्यात आल्याचे समजते.

115 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब
महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अद्यापही सुरू आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेमक्या किती जागा लढणार, याबाबत स्पष्टता झाल्याचे पाहायला मिळत नाही. परंतु, यातच आता भाजपाच्या गोटात हालचालींना वेग आला असून, विद्यमान आमदार, भाजपा समर्थक अपक्ष आमदार यांच्या मतदारसंघातील आढावा घेण्यात आला आहे. यानंतर आता सुमारे 100 ते 115 जणांच्या नावांची शिफारस राज्यातील भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अनेकांना मिळणार डच्चू ?
भाजपाची पहिली यादी आज किंवा उद्यापर्यंत येऊ शकते, असा कयास आहे. दिल्लीत आज यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होत असून या बैठकीनंतर 100 किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांची पहिली यादी येऊ शकते. विद्यमान आमदारांपैकी कोणाची पुन्हा वर्णी लागणार तसेच कोणाचा पत्ता कट केला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

दरम्यान, महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या भाजपाने यंदा किमान 150 जागा लढवण्याचा पवित्रा घेतला असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पक्षाकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांविरुद्ध मतदारसंघात नाराजी आहे अशा आमदारांची तिकिटे भाजपाकडून कापण्यात येतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


कॉपी करू नका.