शहाजी बापू पाटील स्पष्टच म्हणाले ; गुलाल नाही उधळला तर फाशी घेवून मरेल !
सांगोला (23 ऑक्टोबर 2024) : खेड-शिवापूर टोलनाक्यावर गाडीत पाच कोटी रुपयांची रोकड सापडल्यानंतर शहाजीबापू पाटील यांचे नाव पुढे आले व विविध चर्चाही रंगल्या मात्र ती रोकड आपली नसल्याचे शहाजी बापू यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाने अलीकडे त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन, असे आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
खासदार राऊतांना दिला इशारा
शिंदे गटाकडून सांगोल्यातून पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी मिळाली. माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक जिंकलो नाही तर फाशी घेईन असं आव्हान दिलं आहे व खासदार संजय राऊत यांनाही शहाजीबापू पाटील यांनी इशारा दिला.

राऊतांना म्हणाले, तुम्ही आठ सभा घ्या
तुम्ही सात-आठ सभा घ्याव्यात. पण मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असे आव्हान सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना दिले आहे. तसेच शहाजी पाटील यांनी पुण्यात सापडलेल्या पैशांवरुन रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत. मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही. त्यामुळे आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
त्य पैशांशी आपला संबंध नाही
मला पैशांबद्दल सांगोल्यात माहिती मिळाली. ते पैसे रफीक नदाक नावाच्या उद्योगपतीचे आहेत. त्यांनी त्या पैशांची जबाबदारी घेतलेली आहे. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असल्या गोष्टीचा महाराष्ट्राच्या जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. पाठवलेले पैसे पाच कोटी पेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का? रफिक भाईची श्रीमंती संपूर्ण तालुक्याला माहीत असून त्यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितल्याने आता हा विषय संपलेला आहे, असं स्पष्टीकरण शहाजीबापू पाटील यांनी दिलं.




