वंचित आघाडीची सहावी यादी जाहीर : मुक्ताईनगरातून संजय ब्राह्मणे मैदानात
Sixth list of Vanchit Aghadi announced : Sanjay Brahmame from Muktainagar in the field भुसावळ (25 ऑक्टोबर 2024) : वंचित बहुजन आघाडीची सहावी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आतापर्यंत वंचितने 128 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राज्याचे लक्ष लागून असलेल्या व सर्वाधिक चुरशीच्या होणार्या मुक्ताईनगरात
वंचित बहुजन आघाडीने ज्येष्ठ नेते संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली आहे. मुक्ताईनगरात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत ते तूल्यबळ लढत देणार आहे.

45 उमेदवारांची यादी जाहीर
वंचित बहुजन आघाडीने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितने आधी जिल्ह्यातून रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर भुसावळात संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांना भुसावळातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
संजय ब्राह्मणे यांनी अलीकडेच रावेर लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर आता ते मुक्ताईनगरातून जनतेच कौल मागत आहेत. वंचितचा उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे शिक्षण बी.ई. सिव्हील झाले असून सार्वजनीक बांधकाम खात्यात अधिकारी म्हणून त्यांनी दोन दशके काम केले. यानंतर 2014 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते राजकारणात आले आहेत.
मुक्ताईनगरात लढत होणार रंगतदार
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार तर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. यातच आता वंचितच्या तिकिटावरून संजय ब्राह्मणे यांच्यासारखा सुशिक्षित व सर्वार्थाने प्रबळ असणारा उमेदवार देखील मुक्ताईनगरातून लढत असल्याने येथील लढत रंगतदार होईल, यात शंकाच नाही.




