मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर

धुळे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर


धुळे (25 ऑक्टोबर 2024) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर, 2024 मतदान होणार आहे. विधानसभा निवडणूकीत सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

प्रत्येकाला मतदानाचा अधिकार
जिल्हाधिककरी पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी राज्यातीर्ल सर्व विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार असून निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधत्व कायदा, 1951 मधील कलम 135 (ब) नुसार निवडणूक होणार्‍या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमांत किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणार्‍या सर्व उद्योग समुह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.

वेतनात होणार नाही कपात
मंजुर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी. उद्योग विभागांतर्गत येणार्‍या सर्व महामंडळे, उद्योगसमुह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी कळविले आहे.


कॉपी करू नका.