महायुतीचे उमेदवार अमोल जावळे उद्या शक्तीप्रदर्शनानंतर भरणार उमेदवारी अर्ज !
भुसावळ (27 ऑक्टोबर 2027) : रावेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील भाजपातर्फे अमोल हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. जावळे हे सोमवार, 28 रोजी जिल्ह्यातील वरिष्ठ मंत्री व नेत्यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
रावेरातून निघेल शक्ती प्रदर्शन रॅली
अमोल जावळे हे कार्यकर्त्यांसह ढोल-ताशांच्या गजरात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या रॅलीत मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील तसेच महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

रावेर शहरातील पाराचा गणपती मंदिरापासून सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात होईल. रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा रावेरतर्फे करण्यात आले आहे.




