भुसावळात आमदार संजय सावकारे तर रावेरात अमोल जावळे आज शक्ती प्रदर्शन करीत भरणार उमेदवारी अर्ज
भुसावळ (28 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकांचा आखाडा तापल्यानंतर उमेदवारांकडून प्रचाराला जोर आला आहे. त्यातच महायुतीने भुसावळसह रावेरची जागा भाजपाला सोडल्यानंतर भाजपेयींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भुसावळात विद्यमान आमदार संजय सावकारे तर रावेरात अमोल जावळे या उच्च शिक्षीत तरुणाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी सोमवार, 28 रोजी शक्ती प्रदर्शन करीत महायुतीतर्फे अर्ज भरण्यात येणार आहे.
भुसावळात आज शक्ती प्रदर्शन : आमदार संजय सावकारे भरणार अर्ज
भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे हे सोमवार, 28 रोजी हजारो कार्यकर्त्यांसह नेत्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता रॅलीला सुरूवात होणार असून शहरातील जामनेर रोड, बाजारपेठ पोलीस ठाणे, लोखंडी पूल, गांधी पुतळा मार्गे ही शक्ती प्रदर्शन रॅली प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.

या नेत्यांची उपस्थिती
रॅलीत मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष समाधान महाजन यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अधिकाधिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे.
अमोल जावळे यांच्या समर्थनार्थ रावेरातून निघेल शक्ती प्रदर्शन रॅली
रावेर : अमोल जावळे हे कार्यकर्त्यांसह ढोल-ताशांच्या गजरात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या रॅलीत मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील तसेच महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. रावेर शहरातील पाराचा गणपती मंदिरापासून सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात होईल. रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा रावेरतर्फे करण्यात आले आहे.




