खासदार संजय राऊत स्पष्ट म्हणाले : मविआचे बंडखोर अर्ज मागे घेतील !
मुंबई (4 नोव्हेंबर 2024) : महाविकास आघाडीचे सर्वच बंडखोर आपली उमेदवारी मागे घेणार असल्याचा ठाम विश्वासशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी व्यक्त केला. सोमवारी दुपारपर्यंत यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीने अलिबाग, पनवेल व पेण या तीन जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडल्या असून, या तिन्ही जागांवरील आमचे उमेदवार माघार घेतील, असेही संजय राऊत म्हणाले.
मैत्रीपूर्ण लढतीवर आमचा विश्वास नाही
संजय राऊत यांनी सोमवारी म्हणाले की, महाविकास आघाडीतील घटकपक्षांत कोणत्याही मतदारसंघांत संघर्ष होणार नाही. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मागील चार दिवस महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष आपापल्या अर्ज भरलेल्या उमेदवारांशी संपर्क साधला. सोमवारी दिवसभर आम्ही प्रमुख नेत्यांनी चर्चा केली. सोमवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आताच माझी माकप नेते कॉम्रेड कराड यांनी भेट घेतली. त्यांनी नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. आम्ही त्यांना माघार घेण्याची विनंती केली. माझा मैत्रीपूर्ण लढतीवर विश्वास नाही. आमच्यात कुठेही एकमेकांशी लढत होणार नाही असे आमचे ठरले आहे.