वरणगाव ऑर्डनन्समधील पाच रायफल्स चोरीचा उलगडा : तळवेलसह काहूरखेड्यातील तिघांना अटक
Theft of five rifles from Varangaon Ordnance solved : Three arrested from Manyarkheda along with Talvel भुसावळ (5 नोव्हेंबर 2024) : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतून सरावासाठी वापरण्यात येणार्या पाच महागड्या रायफल्स चोरी झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. स्थानिक यंत्रणा, जळगाव गुन्हे शाखा व एटीएसकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना एका संशयीताला एटीएसने अटक केल्यानंतर त्याच्या कबुली जवाबानंतर अन्य दोन संशयीतांनाही अटक करण्यात आली. संशयीतांच्या ताब्यातून दोन महागड्या रायफल्स जप्त करण्यात आल्या. लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे (43, तळवेल, ता.भुसावळ) व निखील कडू थाटे (27, प्रेमनगर, तळवेल, ता.भुसावळ), तुषार विश्वनाथ पाटील (27, काहूरखेडा, ता.भुसावळ) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. संशयीताना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एकाचवेळी पाच रायफल्स लांबवल्या
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील शस्त्रागारातून 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शस्त्रागाराचे कुलूप तोडून ए.के.47- 3 व गलील 5.56 या दोन रायफल्स लांबवल्या होत्या. वरणगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांचा 24 तास खडा पहारा असलेल्या व प्रतिबंधीत क्षेत्रातून चक्क रायफल्स लांबवण्यात आल्यानंतर देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती.
एटीएसकडून समांतर तपास
गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अति महत्वाचा असल्याने महाराष्ट्र राज्याचे ए.टी.एस.प्रमुख, ए.टी.एस.चे आय.जी. व पोलीस अधीक्षक यांनी ए.टी.एस. नाशिक युनिटचे प्रभारी अधिकारी व जळगांव कॅम्पचे ए.टी.एस.पथक तसेच ए.टी.एस.चा तांत्रीक विभाग यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. ए.टी.एस.पथक हे 23 ऑक्टोबरपासून वरणगावात ठाण मांडून होते व गुन्ह्याची बारकाईने व कसोशीने चौकशी करीत होते.
रेल्वे रूळावर फेकल्या तीन रायफल्स
यंत्रणेकडून तपास सुरू असताना तीन चोरी झालेल्या रायफल्स जाडगावजवळील रेल्वे रूळावर सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी बेवारस आढळल्या होत्या व गस्तीवरील रेल्वे कर्मचार्यामुळे ही बाब समोर आली होती. संशयीताला प्रकरण अंगलट येवू पाहत असल्याने त्याने हे कृत्य केल्याची शंका त्यावेळी वर्तवण्यात येत होती तर अन्य एके 47 व अन्य एक गलील रायफल्सचा शोध सुरू होता.
संशयीताला बेड्या : दोन रायफल्स जप्त
सोमवार, 3 रोजी संशयीत लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे (43, तळवेल, ता.भुसावळ) हा एटीएसला शरण आल्यानंतर त्याच्या कबुली जवाबावरून निखील कडू थाटे (27, प्रेमनगर, तळवेल, ता.भुसावळ), तुषार विश्वनाथ पाटील (27, काहूरखेडा, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. संशयीत निलेश थाटे विरोधात 2012 मध्ये ब्राँझ कप चोरीचा गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे.