जातनिहाय जनगणना, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न व बेरोजगारांना चार हजारांची मदत : महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर


मुंबई (6 नोव्हेंबर 2024) : महाविकास आघाडीची पहिलीच सभा मुंबईतील बीकेसी येथे होत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पंचसूत्री जाहीर करण्यात आल्या. त्यात मोफत बससेवा, शेतकर्‍यांसाठी तीन लाखांपर्यंत कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन, जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न व बेरोजगार तरुणांना चार हजारांच्या मदतीचा समावेश आहे.

आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केला जाहीरनामा
महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांच्या एकत्रीत सभेत काँग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. यावेळी तिनही पक्षातील दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीची जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीने जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा केल्या आहेत.

हिंदू धर्मात लाल रंग पवित्र
यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले, राहूल गांधी जे संविधान दाखवतात त्या लाल रंगावरुन फडणवीस यांनी नक्षलवादी म्हटले मात्र आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो, असा पलटवार पटोले यांनी केला.

भाजपा धोरणांमुळे बेरोजगारी वाढली : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. आज प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावला जात आहे. भाजपच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली. भारतात गरिबांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. अदानी आणि अंबानी रोजगार देणार नाहीत तसेच महाराष्ट्रातील युवकांचे रोजगार हिसकावले जात आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.

ही विचारधारेची लढाई आहे. एका बाजूला बीजेपी आरएसएस आणि दुसर्‍या बाजूला इंडिया आघाडी. एका बाजूला आंबेडकरांचे संविधान एकता समानता मोहब्बत रिस्पेक्ट आणि दुसर्‍या बाजूला समोरून नव्हे तर लपून बीजेपी आणि आरएसएसचे लोक या संविधानाला संपवत आहेत. हे समोरून बोलणार नाहीत कारण संपूर्ण देश यांना संपवून टाकू शकतो म्हणून हे लपून या संविधानाला संपवण्याचा घाट घालत आहेत, असेही गांधी म्हणाले.


कॉपी करू नका.