पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा उद्या धुळे शहरात
धुळे (6 नोव्हेंबर 2024) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा शुक्रवार, 8 रोजी धुळे शहरातील गोशाळा मैदानावर होत आहे. धुळे जिल्ह्यातील पाच व मालेगाव बाह्य मतदार संघातील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदी उद्या धुळ्यात येत असल्याने सभेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर व्यासपीठाच्या मागे तीन हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे.
ड्रोन उडवण्यास बंदी
सभेच्या पार्श्वभूमीवर हा परिसर नो फ्लाईर्ंग झोन घोषित करण्यात आला असून सक्षम अधिकार्याची परवानगी घेतल्याशिवाय ड्रोन उडवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत.
वाहतूक व्यवस्थेत बदल
पंतप्रधानांच्या सभेमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी 8 नोव्हेंबरला सकाळी 6 ते सायंकाळी 6 या दरम्यानच्या वेळेत साक्री, मालेगाव, चाळीसगाव, सोनगीरकडून येणारी अवजड वाहने सरळ मुंबई-आग्रा महामार्गाने पारोळा चौफुली तेथून गिंदोडिया चौकमार्गे, ऐशी फुटी रोड, तिरंगा चौक, संत कबीर यांच्या पुतळ्याजवळून शहरात येतील. अवजड वाहने, बस, चारचाकी तसेच तीन चाकी वाहनांसाठी हा आदेश लागू असणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.