मी बंडखोर नाही, जनतेचा उमेदवार ! : घराणेशाहीला जनता कंटाळली : माजी खासदार ए.टी.नाना पाटील
अमोल देवरे
पद्मालय, ता.एरंडोल (7 नोव्हेंबर 2024) : वसंत कारखाना कुणी खाल्ला हे मी सांगण्याची गरज नाही, जनता आता घराणेशाहीला कंटाळली असून मी बंडखोर नाही कारण माझी उमेदवारी जनतेतून असून निश्चितपणे मला मतदारांचे आशीर्वाद लाभतील, असा आशावाद एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार व माजी खासदार ए.टी.पाटील यांनी व्यक्त केले. श्री क्षेत्र पद्मालय येथे गणरायांचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ करीत माध्यमांशी संवाद साधला.
बंडखोर म्हणू नका मी तर जनतेचा उमेदवार
मी बंडखोर उमेदवार नसून जनतेचा उमेदवार आहे. एरंडोल-पारोळा मतदार संघाच्या विकासासाठी मला जनतेने आग्रह केल्यानंतर आपण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहोत. जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत असून मी नक्कीच बंडखोर नाही, मी तर जनतेचा उमेदवार आहे.

घराणेशाहीला जनता कंटाळली
या मतदारसंघात घराणेशाहीला जनता कंटाळली असून कुठलाही विकास झालेला नाही. एरंडो-पारोळा मतदार संघात परिवर्तन होणार असून जनतेचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. वसंत सहकारी साखर कारखाना कुणी खाल्ला, कुणी डुबवला हे जनतेला ठावूक आहे त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत कारखान्यात मुद्दा चर्चिला जातो. आगामी काळात जनतेने आशीर्वाद दिल्यास निश्चितपणे हा कारखाना सुरू होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.




