पाचोर्यातील रहिवासी व सीमा सुरक्षा बलाच्या जवानाकडून सोशल मिडीयावर मतपत्रिका व्हायरल : यंत्रणेकडून गुन्हा दाखल
पाचोरा (6 नोव्हेंबर 2024) : पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रहिवासी असलेले कमलेश हेमराज पाटील यांनी मतदान केल्यानंतर मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल केल्याने त्यांच्याविरोधात मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
असे आहे प्रकरण
पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रहिवासी असलेले कमलेश हेमराज पाटील हे सीमा सुरक्षा बलात आसाम येथे कार्यरत आहेत. त्यांना पाचोरा मतदारसंघातील पोस्टल मतपत्रिका पुरविण्यात आली होती. मतदान केल्यानंतर त्यांनी ती व्हॉटसअॅपवर व्हायरल केली. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. पण त्याआधीच त्यांनी ती व्यक्तीगत मतदानाची पोस्टल मतपत्रिका व्हॉटसअॅपवर व्हायरल केली. परिणामी मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरून या जवानाविरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 136 (1 ग), 136 (2 ख) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
रणजित निंबा पाटील यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.
मतदान पत्रिकेचा फोटो मित्रांना पाठवला
या घटनेबाबत भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांनी कमलेश हेमराज पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा कमलेश पाटील यांनी पोस्टल मतदान करून मतदान पत्रिकेचा फोटो त्याच्या मित्रांना व्हॉटसअॅपवर प्रसारीत केल्याचे सांगितले.