साकळीत 27 वर्षानंतर मिळाला जुन्या आठवणींना उजाळा
स्नेहमिलनात शिक्षकांप्रती कृतज्ञता : शाळेला आठ सीसीटिव्ही कॅमेरे भेट
After 27 years in the chain, get old memories यावल (7 नोव्हेंबर 2024) : यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्या मंदिराच्या सन 1996- 97 मध्ये दहावीच्या बॅचचा स्नेहभेट कार्यक्रम सोमवारी पार पडला. तब्बल 27 वर्षांनी एकत्र आलेल्या 85 मित्र-मैत्रिणींनी विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला. अत्यंत नियोजनबध्द सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या भाग्यविधाता असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना स्मॄतीचिन्ह स्वरुपातील मानपत्र व सरस्वतीची रजत प्रतिमा देवून कृतज्ञता व्यक्त केली. शारदा विद्या मंदिराच्या प्रांगणात झालेला हा स्नेहभेट सोहळा रंगतदार ठरला. राज्यभरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे सक्तीचे करण्यात आले आहेत. सीसीटिव्ही कॅमेर्यांची ही गरज ओळखून विद्यार्थ्यांनी शाळेला आठ सीसीटिव्ही कॅमेरे भेट दिले.
यांची होती उपस्थिती
स्नेहभेट सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.एस.महाजन, एस.बी.अडकमोल, वाय.एस.सोनवणे, पी.एस.जोशी, जी.पी.बोरसे. मुख्याध्यापक आर.जे.माळी, विजयकुमार भावे, एम.आर.पाटील, ए.बी.पाटील, पी.के.बिरारी, एस.जे.पवार, उपशिक्षिका कुसुम पाटील, रजनी फेगडे, जाऊबाई सुरळकर आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना 1997 च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यानी कृतज्ञता सन्मानपत्र (लखोटा) व सरस्वतीची रजत प्रतिमारुपी सन्मानचित्र देवून कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचलन कोअर कमेटीचे सदस्य नरेंद्रकुमार चौधरी यांनी केले.

मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली
प्रीती पाटील यांनी सर्व शिक्षकांचा नामोल्लेख असलेली कविता सादर केली. स्नेहभेट सोहळ्याच्या आयोजन समितीमधील नरेंद्रकुमार चौधरी, चंद्रपाल धाकडे, अरविंद निळे, रमाकांत पाटील, देविदास बडगुजर, प्रीती पाटील, रुपाली महाजन, वैशाली बडगुजर यांनी या कार्यक्रमासाठी सलग तीन महिन्यांपासून व्यापक नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी केला. यानिमित्ताने सर्व मित्रांनी आयोजन समितीचे आभार मानले. यावेळी शारदा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कै.वसंतराव महाजन यांच्यासह मृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मृत मित्रांच्या कुटूंबाला मदतीचा हात
1996-97 च्या बॅचमधील दोन मित्रांचा गेल्या काळात दुर्देवी मृत्यू झाला. कै. रघूनाथ बडगुजर व कै.गलीराम बाविस्कर यांच्या आठवणींनाही उजाळा देवून मित्रांनी जमवलेल्या रक्कमेतून दोघांच्या कुटूंबांना प्रत्येकी 11 हजार रुपयांची आर्थिक मदत घरपोच देण्यात आली. यासोबतच त्यांच्या मुलांना आगामी काळात शिक्षणासाठी कोणत्याही स्वरुपाची अडचणी आल्यास मदतीचे आश्वासन दिले. अल्प का असेना ही मदत निखळ मैत्री जोपासणारी ठरली.
आपल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करा
माजी मुख्याध्यापक, उपशिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यांनी 1996-97 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे कौतूक केले. शासकीय सेवेपासून शेतकर्यापर्यंत सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपला नावलौकीक केला आहे. आगामी काळातही आपल्या क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करून शाळेचे व गावाचे नाव उज्वल करावे, असे मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, अहमदाबाद, बर्हाणपूर आदींसह मोठ्या शहरांमध्ये स्थायीक झालेल्या सर्व मित्रांनी आवर्जून हजेरी लावली.




