तमाशा सादर करताना अंजाळेतील वग सम्राटाचा धुळ्यात हृदयविकाराने मृत्यू
यावल (7 नोव्हेंबर 2024) : इंटरनेट व सोशल नेटवर्कच्या आजच्या युगात तमाशा जिवंत ठेवणार्या कलावंताचे कला अविष्कार सादर करतांना हृदयविकाराने मृत्यू झाला व खान्देशातील प्रसिद्ध ‘भीमा-नामा अंजाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळा’वर शोककळा पसरली. यावल तालुक्याच्या अंजाळे येथील खान्देशातील प्रसिद्ध भीमा-नामा अंजाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळातील तमाशा कलावंत व वग सम्राट नामदेव आप्पा अभिमन बोरसे (55) यांचे धुळे येथे एका कार्यक्रमात तमाशा सादर करीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता ऐन लक्ष्मीपूजनच्या दिवशी घडली. या घटनेने खान्देशावर शोककळा पसरली. नामदेव अभिमान बोरसे (55, रा. अंजाळे ता. यावल) असे मयत तमाशा कलावंताचे नाव आहे.
त्यांनी 1990 साली त्यांनी भिमा नामा या नावाने लोकनाट्य तमाशा मंडळांची स्थापना केली त्यांच्या तमाशा कार्यक्रमात 70 ते 75 लोक कार्यक्रम करायचे म्हणजेच एकूण 75 परिवाराचे पालनपोषण करण्याचे काम त्यांचे तमाशा मंडळ करायचे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. खांदेशातील प्रसिद्ध भीमा-नामा अंजाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळ हे गेल्या 40 वर्षापासून खांदेशामध्ये आपला नावलौकिक मिळवून आहे. यातील भीमा म्हणजेच भीमराव बोरसे हे नामदेवराव बोरसे यांचे सख्खे भाऊ भीमराव यांचे सात वर्षांपूर्वीच निधन झाले तर नामदेवराव बोरसे हे स्वतः आता तमाशा सादर करीत असत.
तमाशा रंगात आला असतानाच निधन
शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांचा धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथे यात्रोत्सवात रात्री 8 वाजता तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना व तमाशा ऐन रंगात आला असतानाच नामदेवराव बोरसे यांना त्रास जाणवू लागला. अचानक छाती दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह खांदेशातील लोककला क्षेत्रात दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांसह कलावंत सहकार्यानी आक्रोश केला. खान्देशातील मनोरंजन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.