15 वर्ष आमदार राहूनही भुसावळकरांना पाणी नाही ; डॉ.लोणीकरांकडून गरीबांची अवहेलना : भुसावळातील प्रचार सभेत जगन सोनवणे यांची कणखर टीका


भुसावळ (7 नोव्हेंबर 2024) : भुसावळात आमदार संजय सावकारे हे तब्बल 15 वर्ष सत्तेवर राहिले मात्र शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार झाली नाहीत, घोटभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत असून तर दुसरीकडे डॉ.लोणीकरांकडून गरीबांची अवहेलना सुरू आहे. भुसावळचे हे चित्र बदलायचे असल्यास त्यासाठी वंचित आघाडीशिवाय पर्याय नाही, असे विचार वंचित आघाडीचे उमेदवार जगनभाई सोनवणे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील नेहरू मैदानावर गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजता वंचितचे युवा पदाधिकारी सुजात आंबेडकर यांची सभा झाली. तत्पूवी वंचित उमेदवार जगन सोनवणे यांचे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत तडाखेबाज भाषण झाले.

15 वर्षानंतरही शहराला पाणी नाही : जगन सोनवणे
वंचित आघाडीचे उमेदवार जगन सोनवणे म्हणाले की, गेल्या 15 वर्षांपासून सत्तेवर असलेले आमदार संजय सावकारे शहराच्या समस्या सोडवू शकलेले नाहीत. शहरात काही महिन्यांपूर्वी फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी रस्ते, पाणी, वीज, बेरोजगारी याबाबत ‘ब्र’ शब्द सुद्धा काढला नाही. आम्हाला शहरात नफरत पसरवायची नाही मात्र शांतता हवी आहे. 15 वर्ष आमदार असूनही शहरातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे दुदैव आहे. गणेशोत्सवात गणरायाला डोक्यावर घेवून आम्ही आंदोलन केले मात्र तरीही यांना जाग नाही, सण-उत्सवातही नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सोसावा लागला. जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी 15 वर्षात साधी तक्रारपेटी आमदार लावू शकले नाही वा जनता दरबारही त्यांनी घेतला नाही, असे जगनभाई सोनवणे म्हणाले. कामगारांच्या विरोधात भूमिका घेवून लाल झालेले कमळ असल्याची टीका त्यांनी केली.


मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारे डॉ.लोणीकर
काँग्रेसचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर यांच्यावर कणखर शब्दात जगन सोनवणे यांनी टिका केली. ते म्हणाले की, रुग्णसेवा यांच्याकडून केली जाते, असे हे सांगतात मात्र गोर-गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे डॉ.लोणीकर असल्याचा घणाघात जगनभाई यांनी केला. एका रुग्णाचे निधन झाल्यानंतर पैसे घेतल्याशिवाय यांनी मृतदेह दिला नाही, असा आरोपही जगन सोनवणे यांनी यावेळी केला. कोरोनाच्या काळात पाच हजारांचे रेमेडेसीवीर यांनी 25 ते 50 हजारांमध्ये विकल्याचा आरोप सोनवणे यांनी करीत ही कसली रुग्णसेवा? असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.

संतोष चौधरींनाही इशारा
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावरही जगन सोनवणे यांनी शेलक्या शब्दात टीका करीत त्यांना सूचक इशारा दिला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगरसेविका पुष्पा सोनवणे, रवी सपकाळे, निर्मिती जगन सोनवणे, वंदना सोनवणे, युवराज नरवाडे, आरीफ सोनवणे, राकेश बग्गन, हरीष सुरवाडे, अनिल सुरवाडे, सचिन बार्‍हे, सुरेश कोलते, प्रमोद फिरके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !